Raigad News : काळनदी पुलाच्या भरावाला १५ दिवसांत गेले तडे

निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करा; राष्ट्रवादी काँ. शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
Poor Quality Road Work
Poor Quality Road Workpudhari photo
Published on
Updated on

माणगाव : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या पंधरा दिवसांत तडे जाऊन मोठमोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार, कामाची देखरेख करणारे अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन बुधवार, १ जुलै २०२६ रोजी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, माणगावचे उपविभागीय अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महाड विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संताजी पवार, जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, माणगाव तालुकाध्यक्ष राजू रोडेकर, महाड शहराध्यक्ष पराग वडके, स्वप्नील सुतार, सीताराम भोनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Poor Quality Road Work
Sindhudurg News : बनावट सह्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरुद्ध गुन्हा

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, काळ नदीवरील पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच भरावाला तडे जाऊन खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक प्रकल्पाची अशी अवस्था होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भराव खचण्यास सुरुवात झाल्याने संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा संशय अधिक बळावला असून कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

रायगड जिल्ह्यात पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. भराव अधिक खचल्यास किंवा रस्त्याची स्थिती आणखी बिघडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुंबई–गोवा महामार्गावर यापूर्वीही निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक अपघात घडले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र दोषींवर प्रभावी कारवाई होत नसल्याने अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.

Poor Quality Road Work
Khed Road Potholes Scam: खेड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्डे भरण्याचे फसवे रेकॉर्ड!

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाने काळ नदी पुलाच्या भरावाच्या कामाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे, पुलाच्या भरावासह संपूर्ण संरचनेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा निकृष्ट कामांना आळा घालण्यासाठी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

  • पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलाची सुरक्षितता सुनिश्चित करून नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही पक्षाने नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) रायगड जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news