

Amba and Kumbhe project expansion
रायगड : रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि एनटीपीसी लिमिटेड यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या निर्णयामुळे दोन्ही प्रकल्पांची एकूण क्षमता १८०० मेगावॅटवरून २६०० मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.
मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आणि एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक ई. सत्या फानी कुमार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्रकल्पाच्या क्षमतावाढीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
राज्य सरकारने २० डिसेंबर २०२३ रोजी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत आतापर्यंत ५९ सामंजस्य करार झाले असून, एनटीपीसीसोबतचा हा ६० वा करार आहे. या सर्व करारांद्वारे सुमारे ८२,०१५ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सुमारे ४.२८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १.३१ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे.
एनटीपीसी लिमिटेडने अंबा व कुंभे प्रकल्पांचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर त्यांच्या क्षमतेत ८०० मेगावॅटने वाढ करण्याची शक्यता अधोरेखित केली. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) यासाठी मूळ करारात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार एनटीपीसीच्या विनंतीवरून सुधारित सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील वीज निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून ऊर्जा क्षेत्राला मोठा बळकटी मिळणार आहे.