Raigad AIDS prevention : रायगडात एड्सविरोधी लढ्याला मोठे यश!

तपासण्यांमध्ये वाढ : संसर्गाचे प्रमाण ०.१७ टक्क्यांवर : ९७ टक्के रुग्णांत विषाणू नियंत्रणात
Raigad AIDS prevention
Raigad AIDS preventionpudhari photo
Published on: 
Updated on: 

पनवेल : महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंधक संस्था आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात एड्सविषयी जनजागृती, तपासणी, प्रतिबंध व उपचार मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. प्रगती अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, त्यातून जिल्ह्यातील एड्सविरोधी मोहिमेला आलेले यश अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असतानाच संसर्गाचे प्रमाण घटल्याचे चित्र या अहवालातून समोर आले आहे.

संसर्गाचे प्रमाण ०.१७ टक्क्यांवर

जिल्ह्यात सर्वसाधारण नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट १७,४३२ इतके निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ४३,५१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. उद्दिष्टाच्या तुलनेत जवळपास अडीचपट अधिक काम झाले आहे. गरोदर मातांच्या तपासणीतही उल्लेखनीय कामगिरी झाली असून ११,७५६ तपासण्यांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १८,३१४ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.

Raigad AIDS prevention
Drug destruction : नवी मुंबईत २६.३० कोटींचे ७२६ किलो अमली पदार्थ नष्ट

या कालावधीत सर्वसाधारण नागरिक

आणि गरोदर माता मिळून तब्बल ६१,८३३ जणांची तपासणी झाली. त्यापैकी १०३ जणांमध्ये संसर्ग आढळून आला. यात ९५ सर्वसाधारण नागरिक व ८ गरोदर मातांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण ०.४२ टक्के होते. ते आता ०.१७ टक्क्यांवर आले आहे. तपासणीचा विस्तार वाढत असतानाच संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी ही बाब समाधानकारक मानली जात आहे.

७८.४२ टक्के रुग्ण उपचाराच्या प्रवाहात

रायगड जिल्ह्यात सन २००२ पासून आतापर्यंत एकूण ११,२४२ जणांमध्ये संसर्ग आढळून आला आहे. सुरुवातीच्या काळात संसर्ग झालेल्या व्यक्तींची वेळेत उपचारासाठी नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होते. सन २००९ मध्ये केवळ २४ टक्के रुग्ण उपचारपूर्व नोंदणीच्या प्रक्रियेत येत होते.मात्र, जनजागृती, समुपदेशन व तपासणीची सुविधा वाढल्यामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सन २०२६ मध्ये हे प्रमाण ७८.४२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Raigad AIDS prevention
Sugar crushing season : यंदा गाळप हंगाम ७० दिवसांचाच

संसर्गाचे निदान झाल्यानंतर रुग्णांना लवकरात लवकर उपचाराच्या प्रवाहात आणण्यात येत असल्याने त्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. वेळेत उपचार मिळाल्याने गंभीर गुंतागुंत व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासही मदत होत आहे.

नियमित उपचाराचा सकारात्मक परिणाम

एड्सग्रस्त रुग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचाराचा परिणाम किती प्रभावी आहे, हे तपासण्यासाठी विषाणूची संख्या मोजणारी विशेष चाचणी केली जाते. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत जिल्ह्यातील १,६७३ रुग्णांची ही चाचणी करण्यात आली.त्यापैकी तब्बल १, ६२६ रुग्णांत म्हणजेच सुमारे ९७ टक्के रुग्णांमध्ये विषाणू नियंत्रणात असल्याचे आढळले. उपचार नियमितपणे घेतल्यास संसर्ग नियंत्रणात ठेवून रुग्णांना दीर्घकाळ सामान्य जीवन जगता येऊ शकते, हा संदेशही यातून जात आहे.

पनवेलमध्ये उपचार व्यवस्थेला बळ!

पनवेल तालुक्यात रुग्णांचे प्रमाण सुमारे १० टक्के आहे.वाढत्या शहरीकरणामुळे रुग्णांचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.मात्र रुग्णांची तपासणी, निदान व उपचार या बाबतीत पनवेल तालुक्याने आघाडी घेतली आहे.

४,६४२ रुग्ण नियमित औषधोपचारात

रायगड जिल्ह्या तीन ठिकाणी विषाणूविरोधी औषधोपचार केंद्रांच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालय, लोधिवली येथील धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालय या केंद्रांमधून रुग्णांना उपचार, समुपदेशन व आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.या तीनही उपचार केंद्रांवर आतापर्यंत ७,८९० रुग्णांची कायमस्वरूपी नोंद झाली आहे. त्यापैकी ७ ,०९३ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या ४,६४२ रुग्ण नियमितपणे औषधे घेत आहेत. विशेषतः कामोठे येथील उपचार केंद्राची कामगिरी उल्लेखनीय असून, तेथील ८२ टक्के रुग्ण उपचाराच्या प्रवाहात कायम आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news