

Car Falls into Valley Ambenali Ghat
पोलादपूर : आंबेनळी घाटात गुरूवारी (दि.२५) सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात गाडीतील एकूण पाच जणांपैकी दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर गाडीमध्येच असलेल्या दहा वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली. मात्र, फोनवर लहान मुलाचा आवाज असल्याने सुरुवातीला अपघात बसचा झाला की काय, असा संभ्रम निर्माण झाला. तसेच अपघाताचे नेमके ठिकाण स्पष्ट न समजल्यामुळे शोधकार्याला उशीर झाला. अपघातस्थळ शोधण्यापासूनच मदतकार्याला सुरुवात करावी लागली. अखेर अथक प्रयत्नांनंतर घटनास्थळ निश्चित झाल्यानंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खोल दरी, घनदाट जंगल आणि अत्यंत अवघड भौगोलिक परिस्थिती असूनही रेस्क्यू पथकांनी दोरखंड, सुरक्षासाधने आणि अन्य आवश्यक उपकरणांच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य राबवले. या मोहिमेत अजित जाधव, आशिष बिरामणे, अनिकेत वागदरे, संकेत सावंत, ऋषिकेश जाधव, साई हवलदार, विक्रांत जाधव, सुनील बाबा भाटिया, सुजित कोळी, अमीत कोळी, अनिल केळगणे तसेच इतर सहकारी मित्रांनी विशेष मेहनत घेतली.
या संपूर्ण घटनेदरम्यान पोलीस प्रशासनाने वेळीच सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांशी संपर्क साधून मदत बोलावली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, तर पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे काम सुरू होते.
आंबेनळी घाटात यापूर्वीही वारंवार अपघातांच्या घटना घडल्या असून या दुर्घटनेमुळे घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, दहा वर्षीय मुलाने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि ११२ क्रमांकावर वेळेत केलेल्या कॉलमुळेच बचावकार्य सुरू होऊन मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.