

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील दिविल गावात गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्रीसाठीच्या बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात ६ लाख १५ हजार ५६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अलिबाग युनिटला दिविल गावातील कदमवाडी येथे अवैध दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक सतीश गावडे यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या बाटल्यांमध्ये भरून, त्यावर बनावट बुचे आणि लेबल लावून विकण्याच्या उद्देशाने साठवल्याचे उघड झाले.
जप्त केलेला मुद्देमाल :
विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या (एकूण १८४४)
१२०० बनावट बुचे
४१२९ बनावट लेबले
एकूण किंमत: ६ लाख १५ हजार ५६० रुपये
याप्रकरणी रुपेश सुरेश मोरे याला अटक करण्यात आली असून, आणखी दोन संशयितांचा शोध सुरू आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.