

रायगड : लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 63 हजार 782 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणांस्तव ती प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे. सध्या 22 हजार 375 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे.
रायगडमधील लाभार्थी महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 31 मार्च 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे. पनवेल आणि अलिबाग तालुक्यात ई-केवायसी रखडण्याची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत.
महाराष्ट्र शासनाची ‘लाडकी बहीण‘ योजना सन 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण, स्वावलंबन वाढविणे व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणे
अलिबाग- 2 हजार 633, कर्जत- 1 हजार 962, खालापूर- 1 हजार 772, महाड- 1 हजार 656, माणगाव- 1 हजार 799, म्हसळा- 808, मुरुड- 713, पनवेल- 5 हजार 140, पेण- 1 हजार 533, पोलादपूर- 427, रोहा- 844, श्रीवर्धन- 787, सुधागड-पाली- 489, उरण-1 हजार 376, तळा- 436.
लाभ होऊ शकतो बंद
ई-केवायसी करताना अडचणी येत असल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेंतर्गत मिळणारा लाभ बंद होऊ शकतो, असे महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.