

डोंबिवली : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्रात निघणाऱ्या स्वागतयात्रांची जननी म्हणून ओळख असलेल्या सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा यंदा काहीशी आगळी वेगळी राहणार आहे. यंदाच्या स्वागतयात्रेत वंदे मातरम् गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभक्तीपर उपक्रमांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वोच्च बलिदानालाही अभिवादन केले जाणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थेतर्फे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या नववर्ष स्वागत यात्रेबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी श्री गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्षा अलका मुतालिक, संयोजन समिती प्रमुख अमेय काटदरे, सचिव प्रवीण दुधे, उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, उपाध्यक्ष सीए सुहास आंबेकर, श्रीपाद कुलकर्णी, गौरी कुंटे, राजय कानिटकर उपस्थित होते.
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा 28 वे वर्ष असून यंदाची स्वागतयात्रा वंदे मातरम् गीताला 150 व्या वर्षी या संकल्पनेवर आधारित आहे. श्री गणेश मंदिराच्या पुढाकारातून हा गावकीचा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यंदा स्वागत यात्रेच्या संयोजन समितीत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली असून उत्सवाच्या नियोजनात तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
यावर्षी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन विशेष, तसेच वंदे मातरम् गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध सांस्कृतिक आणि देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 7 मार्च रोजी डोंबिवलीतील 37 शाळांमधील जवळपास 1800 विद्यार्थी सामुदायिक देवदेशोपासना आणि वंदे मातरम् गायनात सहभागी होणार आहेत.
याशिवाय 15 मार्च रोजी अथर्वशीर्ष पठण, राष्ट्रभक्तिपर गीत गायन, वादन-नृत्य स्पर्धा, तरुणांसाठी बाईक रॅली, सामुदायिक श्रीसूक्त पठण आणि दीपोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त बुधवारी 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी शिवशंभू रणशौर्य अमृतगाथा या गीत-नृत्याविष्कारातून वीरांना आदरांजली भागशाळा मैदान येथे अर्पण करण्यात येणार आहे. तसेच नाशिक येथील महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज युवा पिढीसोबत संवाद साधणार आहेत.
नववर्ष स्वागत यात्रा...
गुरुवारी 19 मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण डोंबिवलीच्या महापौर
ॲड. हर्षाली चौधरी थविल यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा करण्यात येईल. त्यानंतर पंचांगवाचन, श्रीरामाची महापूजा, प्रतिनिधी गुढी उभारणे तसेच श्री गणरायाच्या पालखीचे पूजन मंगलमय वातावरणात ढोल ताशांचा गजरात स्वागत यात्रेसाठी पालखी प्रस्थान करेल. भागशाळा मैदान येथून सकाळी सव्वा सात वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ होईल.
तरुणाईला आवाहन
या नववर्ष स्वागत यात्रेत 100 हून अधिक संस्था आणि संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे डोंबिवलीकरांनी विशेषतः शहरातील तरुणाईने मोठ्या संख्येने या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वागत यात्रेचा समारोप साडेदहा वाजण्याच्या सुमारास फडके रोडवरील आप्पा दातार चौकात करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.