

अलिबाग ः रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. सर्व नगरपालिकांची मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने निकालासाठी तब्बल 19 दिवस वाट पहावी लागणार आहे.
नगरपालिका निवडणूकीसाठी आज मतदान झाल्यानंतर लगेचच उद्या (बुधवार) मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान आज मतदान झालेल्या आणि 20 नोव्हेंबर रोजी होणारया मतदानाची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी घ्यावी असे निर्देश न्यायालयाने दिल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
आज ज्या नगरपालिकांसाठी मतदान झाले त्यांची मतमोजणी 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. म्हणजे निकालासाठी 19 दिवस वाट पहावी लागणार आहे. हा कालावधी खूप मोठा आहे. एवढे दिवस उत्सुकता ताणली जाणार आहे. राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या मनावर मतमोजणी आणि निकालाचे दडपण राहणार आहे.