

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 75 टक्के इतके मतदान झाले. सकाळी मोजक्याच केंद्रांवर थंडीतही उत्साह दिसून आला. मात्र दुपारनंतर खऱ्या अर्थाने केंद्रांवर रांगा पहायला मिळाल्या. अलिबागसह जिल्ह्यातील काही मतदार केंद्रांत मतदान यंत्रणेत बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबल्याच्या घटना घडल्या.
जवळपास साडे तीन ते चार वर्ष प्रलंबित राहिलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबर चा मुहूर्त मिळाला. 10 नगराध्यक्ष पदासाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत.तर नगरसेवक पदासाठी 575 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.रायगडात नगराध्यक्ष पदासाठी अलिबागमध्ये शेकाप-काँग्रेस-मनसे आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट अशी दुरंगी लढत आहे.
रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट, माथेरानमध्ये महायुती विरुद्ध शिवराष्ट्र पॅनल अशी लढत आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-शिवसेना उबाठा महापरिवर्तन आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट युती अशी लढत आहे. पेणमध्ये भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध पेणकर आघाडी अशी लढत आहे. मुरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध शेकाप अशी तिरंगी लढत आहे.
श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उठाबा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी चौरंगी लढत होत आहे. उरणमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध अपक्ष अशी चौरंगी लढत आहे. खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत आहे. महाडमध्ये पंचरंगी लढत नगराध्यक्ष पदासाठी होत आहे.
माथेरानमध्ये मतदानादरम्यान 5 लाखांची रोकड जप्त
माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता मंगळवारी सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर सकाळी प्रभाग क्र.10 मध्ये पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह प्रकाश गुप्ता नामक व्यक्तीला भरारी पथकाने पकडल्याने खळबळ उडाली आहे. चौकशी केली असता एका हॉटेलचा कर्मचारी असून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची ही रक्कम असल्याचे त्याने सांगीतले आहे. दरम्यान पाच लाख रुपयांची ही रक्कम सध्या जप्त करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.