

नेवाळी : एमआयडीसीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेल्या काटई- खोणी- अंबरनाथ महामार्गाच्या काँक्रीटीकरणाची गुणवत्ता पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. खोणी म्हाडा परिसरात महामार्गावरील पाण्याचा निचरा नाल्यात होण्याऐवजी उलट नाल्यातील पाणी थेट महामार्गावर वाहू लागल्याने संपूर्ण महामार्ग जलमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालक ,कामगार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून एमआयडीसीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्गाचे काँक्रीटीकरण करताना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याचे चित्र प्रत्यक्षात समोर आले आहे. नाल्यातील पाण्याचा प्रवाह रस्त्यावर आल्याने वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्थानिकांच्या मते, काम सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दर्जेदार कामावर लक्ष ठेवले नाही. अनेक त्रुटींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही प्रत्यक्ष कामाची पाहणी करून गुणवत्तेची खातरजमा केली नसल्याने आज सर्वसामान्यांना या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागत आहे. निधी मंजूर करून प्रसिद्धी घेण्यापलीकडे कामाच्या दर्जावर कोणीही लक्ष दिले नसल्याची टीका नागरिक करत आहेत.
खोणी फाट्यापासून अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहतुकीवर या प्रकाराचा परिणाम झाला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नसून नाल्यातील पाणीच महामार्गावरून वाहत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण जलनिस्सारण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्याच पावसात उघड झालेल्या या गंभीर त्रुटीमुळे एमआयडीसीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून दोष दूर करावेत, तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.