रायगडावरील शिवकालीन तलावांचे शास्त्रीय वास्तव उजेडात!

रायगडावरील शिवकालीन तलावांचे शास्त्रीय वास्तव उजेडात!

महाड; श्रीकृष्ण द. बाळ :  हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावर मे महिन्यातही असणारा मुबलक पाणीसाठा हा साडेतीनशे वर्षांनंतर ही शासकीय यंत्रणेला विचार करायला लावणारा ठरला आहे. मात्र या संदर्भातील ऐतिहासिक शास्त्रीय वास्तव रायगड प्राधिकरणामार्फत या गडावरील तलावांच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत समोर आले आहे.

किल्ले रायगडावरील श्रीगोंदा तलावाच्या जतन व संवर्धना वेळी या तलावाच्या खाली सुमारे 13 ते 15 फूट खोल अंतर्गत टाकी असल्याचे आढळून आल्याने छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळात पाण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले वैशिष्ट्यपूर्ण नियोजन उजेडात आणण्यात रायगड प्राधिकरणाला यश प्राप्त झाले आहे. या संदर्भात रायगड प्राधिकरणाचे कन्सर्वेशन आर्किटेक्ट वरूण भांबरे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने हिरकणी बुरुजा आधी असलेल्या श्रीगोंदा तलावाचे व बाजारपेठेमागील फुटलेल्या तलावाचे जतन व संवर्धन सुरू असल्याची माहिती दिली.

या तलावाच्या आत खालील कातळामध्ये 13 फूट खोल व 40 फूट रुंद कोरीव टाके आहे. गाळ काढल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच प्रामुख्याने 14 फूट रुंद असलेल्या तलावाच्या भिंतींचे काम हाती घेण्यात आले आहे. या भिंतींच्या बाहेरील बाजूचे दगड निखळून पडले आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करून प्रत्येक थराच्या अनुषंगाने दगडांवर नंबरिंग करून जागा निश्चित केली आहे. त्या पद्धतीने या तलावाचे दगड लावण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या दगडाच्या खालील बाजूस गळती आढळून आली होती, ती काढण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर तलावाच्या 14 फूट रुंद भिंतीच्या वरील पृष्ठभागाचे वॉटरप्रुफींग केले जाणार आहे ,असे भामरे यांनी स्पष्ट केले. आता गुरुत्वाकर्षणाच्या (ग्रॅव्हिटी) माध्यमातून रायगड परिसरातील सर्व गावांना बाराही महिने पाणीपुरवठा करणे शक्य होईल का याबाबतचा अभ्यास सुरू केला आहे .शिवकाळातील विविध वैविध्यपूर्ण वास्तूंचे संवर्धनाचे काम केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत सुरू करण्यात आले असतानाच रायगड प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आलेल्या तलावांच्या जतन व संवर्धनातून शिवकालीन तलावांची शास्त्रीय निर्मिती समोर आली आहे. यामुळेच किल्ले रायगडावर मे महिन्यातही मुबलक पाणीसाठा कसा उपलब्ध होऊ शकतो याचे वास्तव उलगडण्यास मदत झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news