

महाड : तब्बल पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तीन लाख रुपयांची लाच प्रत्यक्ष स्विकारताना शुक्रवारी पोलीस हवालदार विशाल वाघाटे (ब.क्र ९६१) यास महाड शहरातील दस्तूरीनाका परिसरात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे.
रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला हवालदार विशाल वाघाटे याने एका तक्रारदाराकडून पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी तसेच मदत करण्याच्या मोबदल्यात एकूण पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील तीन लाख शुक्रवारी देण्यास सांगीतले होते.
दरम्यान या प्रकरणी संबंधीत तक्रारदारांने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात बुधवार ८ ऑक्टोबर रोजी रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची खातरजमा व पडताळणी करुन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांनी आपल्या विशेष पथकासह महाड शहरातील दस्तूरीनाका या नियोजित ठिकाणी सापळा लावला. आणि पाच लाख रुपयांच्या मागणी केलेल्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपये स्वीकारताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या प्रत्यक्ष विशेष पथकाने हवालदार विशाल वाघाटे याला रंगेहात जेरबंद केले.
या प्रकरणी हवालदार विशाल वाघाटे यांच्या विरुद्ध महाड शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखालील या विशेष पथकात पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, नारायण सरोदे, सहायक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊळ, पोलीस हवालदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, महिला पोलीस शिपाई मोनाली पाटील आणि अनंत घरत यांचा समावेश होता.
सापळा कारवाईस ठाण परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
रायगड जिल्ह्यात महाड येथे झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्टाचार विरोधी मोहिमेस अधिक गती प्राप्त झाली असून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसविण्यासाठी नागरिकांनी व तक्रारदारांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोणतीही भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.