

इलियास ढोकले
नाते : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी...’ आईच्या प्रेमाची महती सांगणारे हे शब्द आजच्या काळातही एका तरुणाने आपल्या कृतीतून सार्थ ठरविले आहेत. आई गंभीर आजारातून सुखरूप बरी व्हावी, यासाठी किल्ले रायगडावर गुडघ्यावरून चालत येण्याचा नवस केलेल्या २४ वर्षीय संदेश तुकाराम पवार याने रविवारी हा नवस पूर्ण केला. संपूर्ण किल्ला गुडघ्यावरून पार करत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात तसेच समाधीस्थळी दंडवत घालून आपल्या माऊलीच्या आरोग्यासाठी केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.
पोलादपूर तालुक्यातील ढवळे गावचे संदेश पवार गेल्या काही वर्षांपासून आपल्या मोठ्या भाऊ-बहिणीसह आईसोबत कोपरखैरणे येथे वास्तव्यास आहेत. संदेश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत खासगी नोकरी करतो. काही दिवसांपूर्वी त्याची आई गंभीर आजारी पडल्याने तिला मुंबईतील सत्यम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर संदेशने आई बरी झाल्यास रायगडावर गुडघ्यावरून चालत येण्याचा नवस केला होता.
दरम्यान, डॉक्टरांनी केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत आईची प्रकृती सुधारली आणि ती सुखरूप घरी परतली. आई बरी झाल्यानंतर संदेशने आपला नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
रविवारी (दि. २७) सकाळी साडेसातच्या सुमारास त्याने किल्ले रायगड चढण्यास सुरुवात केली. गुडघ्यावरून मार्गक्रमण करत तो सायंकाळी पाचच्या सुमारास गडावर पोहोचला. त्यानंतर राजदरबार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दंडवत घालत त्याने नवसपूर्ती केली.
नवस पूर्ण केल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास माणगाव येथून एसटीने संदेश कोपरखैरणे येथील आपल्या घरी सुखरूप परतला. त्याला दोन बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. वडिलांचे लहानपणीच निधन झाले असून, ढवळे येथील नातेवाईक सध्या गुजरातमध्ये वास्तव्यास असल्याचे त्याने सांगितले.
रायगडावर जाणाऱ्या शेकडो शिवभक्तांनी संदेशच्या मातृप्रेमाची आणि श्रद्धेची दखल घेत त्याला कौतुकाची थाप दिली. त्याच्या आईला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी शिवभक्तांनी शुभेच्छा दिल्या.
आजच्या काळात वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा आधार देणाऱ्या तरुणांसाठी संदेश पवार याची कृती एक वेगळा आदर्श ठरल्याची भावना शिवभक्तांनी व्यक्त केली. आपल्या आईसाठी त्याने केलेली ही रायगडवारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.