

Poladpur Savitri River Pollution
पोलादपूर : पोलादपूर शहरातील घनकचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर अखेर ‘आपली माती आपली माणसं’ संघटनेने आंदोलनाचा मार्ग अवलंबत सावित्री नदी बचावासाठी जोरदार आंदोलन छेडले. संस्थापक राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाला थेट कचरा टाकण्याच्या ठिकाणी नेऊन वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली.
शहरातील घनकचरा सावित्री नदी पात्रात टाकला जात असल्याने नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून भटकी जनावरे व कुत्री येथे जमा होत आहेत. तसेच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने खालच्या भागातील नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
या प्रश्नावर यापूर्वी संघटनेने निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा आंदोलन उभारण्यात आले. आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर नेण्यात आला. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांना घेऊन आंदोलनकर्त्यांनी कचरा टाकण्याच्या ठिकाणी पाहणी केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी घनकचऱ्याचा प्रश्न पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळाल्याची नाराजी व्यक्त केली.
पोलादपूर तक्रार मंचाचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनी या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगितले. शासनाकडून नगरपंचायतीवर सात लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून तो नागरिकांकडून वसूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संस्थापक राज पार्टे यांनी प्रशासनावर टीका करत तातडीने उपाययोजना न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी जागेअभावी अडचणी असल्याचे सांगत पर्यायी जागेचा प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, नामदार भरत गोगावले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता त्यांनी येत्या आठ दिवसांत घनकचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात नागरिक, संघटनेचे पदाधिकारी, विरोधी पक्षनेते, नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता प्रशासन आठ दिवसांत कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.