

पोलादपूर शहर : पोलादपूर शहरातील सह्याद्री नगर येथील रहिवाशी राजेश सखाराम सुतार यांच्या लाकडी फर्निचर वर्कशॉपला मंगळवार रोजी पहाटे चार वाजता च्या सुमारास आग लागून आगीत वर्कशॉप मधील संपूर्ण फर्निचर मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत लाखो रुपयाचे फर्निचर जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.
राजेश सुतार यांचे सह्याद्री नगर येथे लाकडी फर्निचर वर्कशॉप असून या वर्कशॉपला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने या घटनेची माहिती पोलादपूर नगरपंचायत चे कर्मचारी रुपेश जाधव यांनी महाड नगर परिषद गोविंद साळुंखे यांना दिल्यानंतर महाड नगर परिषदेकडून तात्काळ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत वर्कशॉप मधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते..
राजेश सुतार यांच्या वर्कशॉप मध्ये घरगुती वापरासाठी बनवले जाणारे घर उपयोगी वस्तू यामध्ये सोपा, दरवाजे, बेड अन्य इतर फर्निचर संपूर्ण जळून खाक झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले आहे. राजेश सुतार यांचे आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांचे संपूर्ण उदरनिर्वाहाचे साधन बेचिराक झाल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या घटनेची दखल घेऊन या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.
या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना समजतात पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान पोलादपूर नगरपंचायत येथे अग्निशमन यंत्रणा नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडल्यास महाड येथून अग्निशमन यंत्रणाला पाचारण करावे लागते त्यामुळे अग्निशामक बंब येण्यास उशीर होत असल्याने अशा घटना घडल्यास याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.