Drug Detection Machine : आरोग्य विभागात ‘रमण’ इफेक्टमुळे तीन मिनिटांत भेसळयुक्‍त औषधांची तपासणी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा : आठ यंत्रांसाठी ९.६ कोटींचा खर्च; निकृष्ट औषध पुरवठा रोखणे हा उद्देश
Drug Detection Machine
Prakash AbitkarPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना दर्जेदार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण औषधे मिळावीत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात अत्याधुनिक ‘ड्रग्ज डिटेक्शन मशिन’ कार्यान्वित केले आहे. भारतीय नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ या वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित या यंत्रामुळे औषधांच्या नमुन्यांची अवघ्या २ ते ३ मिनिटांत जागेवरच प्राथमिक तपासणी होणार आहे. निकृष्ट औषधांचा पुरवठा रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. राज्यात असे आठ यंत्र बसवले असून, त्यांची किंमत ९.६ कोटी इतकी आहे.

मुंबईतील आरोग्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी या अत्याधुनिक उपकरणाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. शासकीय आरोग्य संस्थांमधील औषधांच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अमेरिकेच्या ‘थर्मो सायंटिफिक’ कंपनीने विकसित केलेले हे पोर्टेबल ड्रग्ज डिटेक्शन यंत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. अशा उपकरणांचा वापर सध्या अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वित्झर्लंड, नायजेरिया, केनिया, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियासह जगातील सुमारे ५० देशांमधील औषध नियामक यंत्रणांकडून केला जातो.

Drug Detection Machine
Thane Water Conservation Campaign : पेंढरघोळ येथे चार वनराई बंधाऱ्यांची उभारणी

१.२० कोटीचे एक यंत्र

या एका उपकरणाची किंमत सुमारे १ कोटी २० लाख रुपये आहे. या यंत्रामुळे औषधाचे पाकीट न फोडता किंवा अत्यंत कमी वेळेत (२ ते ३ मिनिटांत) औषधातील घटकांची अचूक प्राथमिक चाचणी करणे शक्य होणार आहे. औषधांच्या दर्जाबाबत नागरिकांची तक्रार येईपर्यंत थांबण्याऐवजी, जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये आणि ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये अचानक भेट देऊन नमुन्यांची तपासणी केली जाईल. निविदा प्रक्रियेत सादर केलेला दर्जा आणि प्रत्यक्षात पुरवठा केलेल्या औषधांची गुणवत्ता यात काही फरक आहे का, हे यातून लगेच स्पष्ट होईल.

८ विभागांसाठी १६ अधिकाऱ्यांची पथके

यंत्रणेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीची आखणीही करण्यात आली आहे. राज्यातील ८ प्रशासकीय विभागांमध्ये प्रत्येकी २ सदस्यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण १६ विशेष प्रशिक्षित अधिकारी आयुक्तांच्या थेट नियंत्रणाखाली ही मोहीम राबवतील. वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाकडून आलेली औषधे, जिल्हास्तरीय खरेदी, स्थानिक निधी व आपत्कालीन खरेदीतून घेतलेल्या सर्व प्रकारच्या औषधांची रँडम पद्धतीने दरमहा तपासणी केली जाईल.

१२ मान्यताप्राप्त प्रयोगशाळांत ८ दिवसांत अंतिम अहवाल

ड्रग्ज डिटेक्शन यंत्राद्वारे झालेली चाचणी ही प्राथमिक स्वरूपाची असेल. यात नमुना संशयास्पद आढळल्यास तो राज्यातील १२ शासनमान्य बाह्य प्रयोगशाळांमध्ये पुढील रासायनिक विश्लेषणासाठी पाठवला जाईल. तेथून साधारण ८ दिवसांत अंतिम अहवाल प्राप्त होईल. औषधात त्रुटी आढळल्यास अन्न व औषध प्रशासनामार्फत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

‘रमण इफेक्ट’ आहे तरी काय?

भारतीय नोबेलविजेते शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी शोधलेल्या 'रमण इफेक्ट' चा उपयोग औषधांच्या गुणवत्तेची प्राथमिक तपासणी करण्यासाठी होत आहे. एखाद्या पदार्थावर प्रकाश टाकल्यानंतर त्यातून विखुरल्या जाणाऱ्या प्रकाशाच्या काही भागांच्या तरंगलांबीमध्ये बदल होतो. या बदलाला 'रमण इफेक्ट' म्हणतात.

  • १९२८ मध्ये रमण इफेक्टचा शोध सर सी. व्ही. रमण यांनी लावला.

  • १९३० ला या संशोधनासाठी सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • २८ फेब्रुवारीला सी. व्ही. रमण यांच्या रमण इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

Drug Detection Machine
Matheran Horse Association Protest : माथेरानमध्ये घोडेबंद आंदोलन

आरोग्य विभागाचे महत्त्वाचे निर्णय

  • १,४४० डॉक्टरांना ४ नोव्हेंबरला मिळणार नियुक्तिपत्रे

  • १,९०० कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सची भरती प्रक्रिया सुरू

  • १५,००० आरोग्य कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय

  • १,९७० प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०,८४६ उपकेंद्रे अद्ययावत करणार

  • १२५ आरोग्य संस्था जनतेच्या सेवेत दाखल करून घेणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news