

पेण ः स्वप्नील पाटील
पेण शहरात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे आणि याचा त्रास सहाजिकच वाहन चालक आणि नागरिकांना सोसावा लागत आहे.त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता नगरपालिका प्रशासनाने शहरातील वाढते अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.दोन दिवसांपूर्वीच पेण शहरातील बस स्थानकाच्या मागील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून पालिकेने शहरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान शहरातील जी काही महत्त्वाची अतिक्रमणे आहेत ती टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार असल्याचे पेण पालिकेचे नगर रचनाकार सुहास कांबळे यांनी बोलताना सांगितले आहे. औद्योगीकरण वाढत असताना शहराच्या अनेक भागात अतिक्रमणाने विळखा घातला आहे मुख्य रस्त्यांसह जागोजागी अनाधिकृतपणे टपऱ्या तसेच छोटी- मोठी दुकाने यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढत असल्याने येथील नागरिकांना या अनाधिकृत अतिक्रमणांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पेण पालिकेवर पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आल्यानंतर ज्या दिवशी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पदभार स्वीकारला त्याच दिवशी आमदार रविंद्र पाटील यांनी शहरातील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवून नागरिकांना सुसज्ज असे रस्ते ऊपलब्ध करून दिले जातील असे स्पष्ट केले होते, त्या अनुषंगाने आमदार रविंद्र पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच अतिक्रमण हटविण्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक केल्यानंतर आता ही अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार
शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून या कामाला अडथळा येऊ नये यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवायची मोहीम जवळपास हाती घेतलेले दिसत आहे. आमदार रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन त्यानुसार येथील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामे सुरू आहेत.त्यामुळे शहराच्या अंतोरा रोडवरील नरदास चाळ येथील अतिक्रमण हटविले असून त्यानुसार पुढचे ही अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे दिसत असल्याने अशी अतिक्रमणे हटवली तर शहराच्या सौंदर्यकरणात नक्कीच भर पाडणार आहे.
पेण शहर स्वच्छ आणि सुंदर यासह येथील वाढलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिका प्रशासन आता सज्ज झालेली आहे.एकीकडे शहरात रस्ता काँक्रीटीकरणाची कामे सुरू असून त्याला अडथळा होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत ती सर्वच अतिक्रमणे येत्या काही दिवसात काढली जाणार आहेत.
सुहास कांबळे, अधिकारी नगर रचनाकार पेण नगरपरिषद