

जयंत धुळप
रायगड: जागतिक स्तरावर नावाजलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगात सध्या मोठे परिवर्तन पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पेणमधील मूर्तिकारांनी शाडूच्या मातीपासून बनणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या उत्पादनात तब्बल तीन पटीने वाढ केली आहे.
ग्राहक, गणेशमंडळे आणि परदेशातून वाढलेली मागणी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तींचे वर्चस्व हळूहळू कमी होत आहे. शाडूच्या मूर्तींचा नावलौकिक जागतिक पातळीवर झाला आहे. पेण तालुका आणि शहर मिळून दरवर्षी सुमारे ७५ ते ८० लाख गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. या उद्योगात यंदा शाडूच्या मूर्तींची संख्या २५ ते ३० लाखांच्या घरात पोहोचली आहे.
सुशिक्षित आणि पर्यावरणस्नेही नागरिकांकडून, तसेच अनेक गृहनिर्माण संस्थांकडून गेल्या पाच वर्षांपासून शाडूच्याच गणेशमूर्तींना प्राधान्य दिले जात आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशांमध्ये पीओपी गणेशमूर्तींना पूर्णपणे बंदी आहे.
परिणामी, निर्यात होणाऱ्या पेणच्या मूर्तींमध्ये पर्यावरणस्नेही शाडू मातीच्याच आणि नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्तींना सर्वाधिक पसंती मिळत आहे. परिणामी, पेणच्या गणेश मूर्तिकारांनी शाडू माती व कागदाचा लगदा यांच्या मिश्रणाच्या गणेशमूर्ती तयार करण्यावर भर दिला.
पेणच्या कारागिरांचे अफाट कौशल्य
शाडू माती वाळताना तडे जाण्याची शक्यता असते. मात्र, पेणच्या मूर्तिकारांनी आपल्या पारंपरिक कौशल्यात आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शाडूच्या मूर्तींमध्येही पीओपीसारखीच अत्यंत बारीक आणि सुबक नक्षीकाम (फिनिशिंग) साध्य करण्यात यश मिळवले आहे. परिणामी, पेणमधील गणेशमूर्ती ज्या पवित्र, लाेभस आणि शांत चेहऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत, तेच सौंदर्य शाडू मातीच्या गणेशमूर्तीत अबाधित राखण्यात पेणच्या गणेश मूर्तिकारांनी काैशल्यातून यश मिळवले आहे.
पर्यावरणपूरकतेकडे दमदार वाटचाल
बाजारात अजूनही ६५ टक्के वाटा पीओपीच्या मूर्तींचा असला, तरी गेल्या पाच वर्षांतील १० टक्क्यांवरून थेट ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत शाडूच्या गणेशमूर्तींनी मारलेली ही मजल मोठी मानली जात आहे. येत्या काही वर्षांत पेणचा हा संपूर्ण गणेशमूर्ती उद्योग अधिक पर्यावरणपूरकतेकडे वळलेला दिसेल, असा विश्वास खुद्द गणेश मूर्तिकारांनीच व्यक्त केला आहे.
गणेशमूर्ती ग्राहकांनीच पीओपीऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचाच स्वीकार करण्याचा निर्णय घेतल्याने हा माेठा बदल घडून आला आहे. पूर्वी शाडूची गणेशमूर्ती वजनाला जड आणि नाजूक मानली जायची. मात्र, ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही शाडूच्या गणेशमूर्तींचे उत्पादन वाढवले आहे. पेणच्या कलाकारांनी शाडू मातीतही तीच सुबकता आणल्यामुळे शाडूच्या गणेशमूर्तींना अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे.
- नीलेश समेळ, गणेशमूर्तिका