

ठाणे: पुण्यात २०२७ मध्ये होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावासाठी सध्या ज्येष्ठ साहित्यिक, स्वा. सावरकर साहित्याचे लेखक शेषराव मोरे आणि दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या नावाची प्राधान्याने चर्चा सुरू आहे.
महामंडळाच्या गोव्यातील मराठी साहित्य सेवक मंडळ या समाविष्ट संस्थेच्या ऑक्टोबर महिन्यातील वर्धापनदिनाच्या वेळी होणाऱ्या बैठकीत अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
साहित्य संमेलनाला १०० वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरेला साजेशी अनेक नावे साहित्य वर्तुळात आहेत. त्यात ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे, अभिजात मराठी दर्जासाठी अर्वाचीन-प्राचीन मराठीचे गाढे अभ्यासक प्रा. रंगनाथ पाठारे, श्याम मनोहर, वीणा गवाणकर, प्रा. प्रवीण दवणे यांचा समावेश आहे.
भालचंद्र नेमाडे यांनी संमेलनाध्यक्ष होण्यास नकार दिल्याने त्यांचे नाव विचाराधीन नाही. मात्र, यंदा अध्यक्षपदासाठी शेषराव मोरे यांचे नाव चर्चेत आहे. जातीव्यवस्था आणि सामाजिक वास्तवतेवर प्रहारासाठी दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे नावही चर्चेत आहे.