

पेण: यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीत आणि अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये या दृष्टिकोनातून पेण पालिकेने शहरातील नोंदणीकृत इमारतींचा आढावा घेतला. या आढाव्यामध्ये पेण शहरातील 14 इमारती या अत्यंत धोकादायक म्हणून निष्पन्न झाल्या असून जवळपास 37 इमारतींची धोकादायक इमारती म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर इमारतींच्या अध्यक्ष, सोसायटी किंवा मालकांना तशा प्रकारच्या नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.
पेण शहर हे गजबजलेले शहर असून पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विषय लक्षात घेता येथे वास्तव्य करत असणाऱ्या नागरिकांच्या हिताचा आणि त्यांच्या जीविताचा विचार करून शहरात कोणकोणत्या इमारती धोकादायक आहेत वा अत्यंत धोकादायक आहेत याचा आढावा नुकताच बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
त्यामध्ये ज्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत त्यांची योग्य ती डागडुजी करून घेणे आणि अत्यंत धोकादायक इमारती आहेत त्यांनी त्या इमारतीमध्ये वास्तव्य न करता इतर ठिकाणी आपली वास्तव्याची व्यवस्था करावी अशा प्रकारच्या नोटीस पेण पालिकेने संबंधित इमारतीच्या मालक,सोसायटीधारक किंवा अध्यक्षांना जारी केल्या असल्याची माहिती पेण पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नोटिशींचे पालन करा -मुख्याधिकारी
दरवर्षीप्रमाणे पेण शहरातील इमारतींचा पावसाळ्यापूर्वीचा आढावा आम्ही घेतला आहे. अतिवृष्टीमुळे एखाद्या सदनिकेचे किंवा इमारतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन जीवित हानी किंवा वित्त हानी होऊ नये यासाठी शहरातील घेतलेल्या आढाव्याप्रमाणे ज्या इमारती अत्यंत धोकादायक किंवा धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत त्यांनी दिलेल्या नोटीसीचे पालन करावे आणि तशा प्रकारचा अहवाल आमच्याकडे सादर करावा अशा सूचना दिल्या आहेत, त्यांनी त्या सूचनांचा पालन करून पालिकेला सहकार्य करावे, पालन न केल्यास एखादी दुर्घटना घडली तर पालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही.असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सुचित केले आहे.