

सुधागडः सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. तीव्र उन्हामुळे नदी, तलाव, धरणे आणि पाणवठे यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर आटले आहे. या आटलेल्या पाण्यात आता गोड्या पाण्यातील मासेमारी जोरात सुरू झाली आहे.
पाणी कमी झाल्यामुळे विविध प्रकारचे चविष्ट गोडे मासे मोठ्या प्रमाणात हाती लागत असून, ते बाजारात विक्रीसाठी येत आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या या दिवसांत खवय्यांच्या उड्या आता चविष्ट गोड्या पाण्यातील माशांवर पडत असून बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे आणि ओहळ येथील पाणी आटत आल्यामुळे तिथे सापडणाऱ्या माशांची आवक बाजारपेठेत कमालीची वाढली आहे. यामध्ये मळे, कोलीम, म्हूऱ्या, शिवडा, अरलय, वाम, कोलंबी, मोठी शेवंड, कटला, फंटूस व खवल आदी माशांचा समावेश आहे. मळे आणि म्हूऱ्या हा प्रकार या दिवसांत अधिक प्रमाणात मिळतो.
त्यामुळे खवय्ये हे मासे आवर्जून खरेदी करत आहेत. स्थानिक नागरिकांसह काही जण मुंबई, ठाणे आदी शहरांत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना देखील उन्हाळ्याची ही खास भेट म्हणून गोडे मासे पाठवत आहेत.
पारंपरिक कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक सध्याच्या कडक उन्हात खूप मेहनतीने हे मासे पकडत आहेत. नदी, तलाव, धरण येथे टायर ट्यूबवर बसून गाळाने व जाळी टाकून ही मासेमारी केली जात आहे. पाणी आटल्यामुळे मासे पकडणे सोपे झाले असून सध्या मासे खूप मिळत आहेत. हे मासे विकून या कष्टकरी बांधवांच्या हाती चार पैसे मिळत असल्याने त्यांचा उदरनिर्वाह चांगला सुरू आहे.
नातेवाईकांना गोड्या माशांची भेट
सध्या उन्हाळ्यामुळे गोड्या पाण्यातील मासे बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. शहरात असणाऱ्या नातेवाईकांना आवर्जून भेट म्हणून आम्ही हे गोडे मासे पाठवले आहेत. मळे, शिवडा, कटला व म्हूऱ्या हे मासे अनेकांना खूप आवडतात असे माणगाव येथील गृहिणी प्रियांका हेमंत गोसावी यांनी सांगितले.
माशांचे दर (रुपयांमध्ये)
मळे: 200 ते 250 रुपये किलो, कोलीम (बारीक कोळंबी) : 50 ते 60 रुपये वाटा, म्हूऱ्या : 40 रुपये वाटा, शिवडा, कटला व वाम : 500 ते 600 रुपये किलो, मोठी गोडी कोलंबी (शेवंड) : 1000 ते 1200 रुपये किलो, फंटूस : 300 ते 400 रुपये किलो