Matheran News: माथेरानमध्ये ७४ हातरिक्षाचालक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत; ई-रिक्षा व्यवस्थेमुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर

पर्यटकांचा ई-रिक्षांकडे ओढा; हातरिक्षाचालकांच्या संसाराचा गाडा थांबला; अडीच वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित
Matheran News
Matheran NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नेरळ: माथेरानमध्ये पर्यटकांच्या पसंतीमुळे ई-रिक्षा वाहतूक व्यवस्था लोकप्रिय होत असताना, याच व्यवस्थेच्या प्रतीक्षेत असलेल्या ७४ हातरिक्षाचालकांच्या कुटुंबांवर मात्र आर्थिक संकट ओढवले आहे.

शहरात २० ई-रिक्षा सुरू होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला, तरी उर्वरित हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. परिणामी, २० ई-रिक्षाचालकांचा व्यवसाय सुरू असताना ७४ चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Matheran News
Rani Baug Zoo Lions: राणीबागेत १२ वर्षांनंतर पुन्हा सिंहाचे दर्शन; जानेवारीत गुजरातमधून सिंहांच्या जोड्या येणार

पर्यटकांचा ई-रिक्षांकडे वाढता कल आणि हातरिक्षा व्यवसायाला मिळणारा घटता प्रतिसाद यामुळे या चालकांवर अक्षरशः बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माथेरानमधील एकूण ९४ हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन करून पारंपरिक हातरिक्षा पद्धत बंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे चालकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात अडीच वर्षांच्या कालावधीत केवळ २० चालकांनाच ई-रिक्षा चालविण्याची संधी मिळाली आहे.

Matheran News
Ramayana Movie Controversy: रामायण चित्रपटाविरोधात मुलुंडमध्ये पोलिसांत तक्रार; नमित मल्होत्रा, नितेश तिवारींवर कारवाईची मागणी

उर्वरित ७४ चालकांचे पुनर्वसन कधी होणार, त्यांना रोजगाराचे पर्यायी साधन कधी उपलब्ध होणार, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. हातरिक्षा ओढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या चालकांसमोर आता रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ई-रिक्षापुढे हातरिक्षा महागडी

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा कल सध्या ई-रिक्षांकडे अधिक असल्याचे चित्र आहे. ई-रिक्षासाठी प्रति व्यक्ती सुमारे ३५ रुपये भाडे आकारले जात असताना हातरिक्षासाठी प्रति व्यक्ती ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत असल्याने पर्यटकांकडून ई-रिक्षांना अधिक पसंती दिली जात आहे.

ई-रिक्षासाठी पर्यटक तासन्तास रांगेत उभे राहण्यास तयार असतात; मात्र हातरिक्षातून प्रवास करण्यासाठी फारसे पर्यटक पुढे येत नसल्याची परिस्थिती आहे.

यामुळे हातरिक्षाचालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. हातरिक्षा हेच उपजीविकेचे साधन असतानाही दिवसभर रिक्षा घेऊन उभे राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच हातरिक्षा पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था असल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पर्यटकांच्या बदलत्या पसंतीमुळे हातरिक्षा व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद कमी होत असताना पर्यायी रोजगाराची व्यवस्था मात्र अद्याप झालेली नाही.

मॉनिटरिंग कमिटीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हातरिक्षा बंद करून चालकांचे ई-रिक्षा किंवा अन्य पर्यायी माध्यमातून पुनर्वसन होणे अपेक्षित असताना प्रशासकीय पातळीवर अपेक्षित गतीने कार्यवाही होत नसल्याचा आरोप हातरिक्षाचालकांनी केला आहे.

मॉनिटरिंग कमिटी आणि उपसमितीने वेळेत हस्तक्षेप करून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला असता, तर आज चालकांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले नसते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

संघटनेचे पदाधिकारी गप्प का?

या प्रकरणात ई-रिक्षा चालक-मालक संघटनेच्या भूमिकेवरही हातरिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अडीच वर्षांत एकही अतिरिक्त ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेने ठोस प्रयत्न केले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ई-रिक्षा मिळाल्यानंतर संघटनेची जबाबदारी संपली आहे का? केवळ २० चालकांचा रोजगार सुरू झाला म्हणजे उर्वरित ७४ कुटुंबांनी उदरनिर्वाह कसा करायचा, याचा विचार कोण करणार? असा सवाल हातरिक्षाचालकांनी केला आहे.

ई-रिक्षांची संख्या वाढविण्यासाठी निधीची गरज

एकीकडे माथेरानच्या पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने ई-रिक्षा यशस्वी ठरत असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे त्याच व्यवस्थेतून पारंपरिक हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन अपूर्ण राहणे ही गंभीर बाब ठरत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने उर्वरित ७४ हातरिक्षाचालकांना तातडीने पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा, ई-रिक्षांची संख्या वाढविण्यासाठी निधी आणि आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

माथेरानच्या पर्यटन विकासाचा फायदा काही मोजक्या चालकांपुरता मर्यादित न राहता सर्व पात्र हातरिक्षा चालकांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचणार का? प्रशासन, मॉनिटरिंग कमिटी आणि ई-रिक्षा संघटना या प्रश्नावर आता तरी ठोस भूमिका घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.