

पनवेल : पनवेल तालुक्यांत यंदा पावसाने सरासरी गाठण्यात अपयश आल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचे १८ दिवस उलटून गेले असताना यंदा आतापर्यंत केवळ ३ हजार ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत. परतीच्या पावसाची आशाही फोल ठरल्याने पनवेलकरांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पनवेल परिसरात दरवर्षी साधारणत चार हजार मिलिमीटर च्या आसपास पाऊस पडतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलसाठ्यांवरील ताण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जून महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या पावसाने ओढ दिली. परतीचा पाऊस जोरदार बरसेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, ऑक्टोबरचा मध्य उलटूनही पावसाने हजेरी न लावल्याने ही अपेक्षा धुळीस मिळाली आहे.
पाणीपुरवठ्याचे गणित बिघडण्याची शक्यता
पनवेल परिसरात यापूर्वीपासूनच पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे गणित आणखी बिघडण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ न झाल्यास नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि काटकसरीने वापर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहण्याची चिन्हे आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या अखेरीस नद्या-नाले दुथडी भरून वाहतात, तर शेतांमध्येही पाण्याचा साठा दिसून येतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत अपेक्षित पाणी साचलेले नाही. आगामी काळात पाऊस झाला नाही, तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेलकरांचे लक्ष आता उर्वरित पावसाकडे लागले आहे.
पिकाला पुरेशा ओलाव्याची गरज
पनवेल तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने आधीच शेतीच्या हंगामावर परिणाम झाला आहे. त्यातच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठा पाऊस न झाल्याने भातपिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात भाताचे दाणे भरून येण्याच्या अवस्थेत पिकाला पुरेशा ओलाव्याची गरज असते. पावसाने अशीच दडी मारल्यास भातपिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.