Raigad News : ३५ हजार फुटांवर अलिबागचे डॉक्टर ठरले देवदूत! विमानात वाचवले वृद्धाचे प्राण; ३५० युरोंचे मानधनही नाकारले

अलिबागचे डॉ. चंद्रशेखर साठे यांनी दाखवलेले वैद्यकीय कौशल्य, समयसूचकता आणि निष्काम सेवाभाव यांमुळे एका वृद्ध प्रवाशाला नवजीवन मिळाले.
Raigad News
Raigad News : ३५ हजार फुटांवर अलिबागचे डॉक्टर ठरले देवदूत! विमानात वाचवले वृद्धाचे प्राण; ३५० युरोंचे मानधनही नाकारलेfile photo
Published on: 
Updated on: 

At 35 thousand feet Alibaug doctor became an angel! Old man's life saved in plane

रायगड : जयंत धुळप आकाशात ३५,००० फुटांच्या उंचीवर, अत्यंत मर्यादित वैद्यकीय संसाधने असताना अलिबागचे सुप्रसिद्ध डॉ. चंद्रशेखर साठे यांनी दाखवलेले वैद्यकीय कौशल्य, समयसूचकता आणि निष्काम सेवाभाव यांमुळे एका वृद्ध प्रवाशाला नवजीवन मिळाले आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पॅरिसहून मुंबईला येणाऱ्या 'एअर फ्रान्स'च्या (AF 218) विमानातील ही थरारक घटना घडली.

नेमके काय घडले?

पॅरिस ते मुंबई या ९ तासांच्या प्रवासात, उड्डाणानंतर सुमारे ३ ते ४ तासांनी (इराण-अफगाणिस्तानच्या आकाशात असताना) एका ७५ वर्षीय प्रवाशाला गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. केबिन क्रूकडून मदतीचे आवाहन करण्यात आल्यानंतर डॉ. चंद्रशेखर साठे यांनी तात्काळ धाव घेतली आणि पुढील ३ ते ४ तास सतत रुग्णावर उपचार केले.

पहिला प्रसंग: वृद्ध प्रवासी अस्वस्थ आणि अचेतन (Unconscious) अवस्थेत होते. त्यांची सीटवर राहण्याची स्थिती नसल्यामुळे डॉ. साठे यांनी त्यांना विमानातील गॅली (Galley) मध्ये हलवले. तिथे त्यांना खाली झोपवून पाय उंचावले, पल्स, ऑक्सिजन (९०%) व रक्तदाब तपासला आणि ऑक्सिजन पुरवठा सुरू केला. अवघ्या १० मिनिटांत रुग्णाची प्रकृती स्थिर झाली.

दुसरा प्रसंग: सुमारे एका तासानंतर रुग्णाला त्याच्या सीटवरच अपस्माराचे (Epileptic Seizures) झटके येऊ लागले. डॉ. साठे यांनी तात्काळ 'जॉ थ्रस्ट' (Jaw Thrust) करून श्वासोच्छवासाचा मार्ग मोकळा ठेवला आणि डाव्या कुशीवर झोपवून ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत केला.

तीसरा गंभीर अटॅक व तातडीचा निर्णय: मुंबईत लँडिंगच्या ४५ मिनिटे आधी रुग्णाला गॅलीमध्येच पुन्हा तीव्र झटके आले आणि ऑक्सिजन पातळी ८५% वर घसरून त्वचा निळसर (Cyanotic) पडू लागली. या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी, डॉ. साठे यांनी विमानातील मेडिकल किटमधून 'रेक्टल डायझेपाम' (Rectal Diazepam - 10 mg) चा वापर करून रुग्णाचे प्राण वाचवले.

विमान कंपनीची सज्जता आणि डॉक्टरांचा सेवाभाव

एअर फ्रान्सच्या विमानातील कर्मचाऱ्यांकडे ऑक्सिजन (Oxygen), ग्लुकोमीटर (Glucometer) आणि डायझेपाम (Diazepam) सारखी आवश्यक औषधे व वैद्यकीय साधने उपलब्ध होती. कर्मचाऱ्यांनी (Cabin Crew) डॉ. साठे यांना उत्तम सहकार्य केले.

मुंबई विमानतळावर रुग्ण सुरक्षित वैद्यकीय टीमच्या स्वाधीन केल्यानंतर, एअर फ्रान्स कर्मचाऱ्यांनी डॉ. साठे यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि कृतज्ञता म्हणून ३५० युरो (€350) देण्याचे ठरवले. मात्र, "जीव वाचवण्यासाठी मी पैसे घेत नाही," असे सांगत डॉ. साठे यांनी ते पैसे स्वीकारण्यास अत्यंत नम्रपणे नकार दिला.

डॉ. साठे यांच्या या वैद्यकीय कौशल्याचे आणि निस्वार्थ तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अलिबागसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news