

पनवेल: पनवेल मधील ऐतिहासिक वडाळे तलावातील सॅल्विनिया मोलेस्टा (जलपर्णी) या समस्येवर कायमस्वरूपी, शास्त्रीय आणि पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार पनवेल महानगरपालिका आणि आयसीएआर-खरपतवार संशोधन संचालनालय, जबलपूर यांच्या संयुक्त पुढाकारातून जैविक नियंत्रणाची मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचा दुसरा टप्पा नुकताच सुरू करण्यात आला असून, त्याअंतर्गत आणखी ५० हजार ‘सायर्टोबॅगस साल्विनी’ या जैविक नियंत्रण करणाऱ्या विशिष्ट कीटकांना तलावात सोडण्यात आले आहे.
वडाळे तलावातील सॅल्विनिया मोलेस्टा या जलवनस्पतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी या नैसर्गिक जैविक उपायाचा वापर करण्यात येत आहे.
या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात २० हजार सायर्टोबॅगस साल्विनी कीटक तलावात सोडण्यात आले होते. तलावातील अनुकूल वातावरणामुळे या कीटकांचे नैसर्गिक प्रजनन प्रभावीपणे झाले असून, त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सायर्टोबॅगस साल्विनी हे कीटक प्रामुख्याने सॅल्विनिया जलपर्णीवरच उपजीविका करतात. त्यामुळे तलावातील इतर वनस्पती आणि जलपरिसंस्थेतील घटकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० हजार कीटक सोडल्यामुळे जलपर्णीच्या नियंत्रणाच्या प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.
जैवविविधतेच्या संवर्धनाला हातभार
जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तलावातील पाण्याचे अभिसरण सुधारण्यास मदत होणार असून, जलपरिसंस्थेतील नैसर्गिक संतुलन पुनर्स्थापित होण्यास हातभार लागणार आहे. तसेच स्थलांतरित पक्षी आणि इतर जलचरांसाठी अधिक अनुकूल अधिवास निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्यही यामुळे खुलणार आहे अशी माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली आहे.
नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा अवलंब
सॅल्विनिया मोलेस्टा ही दक्षिण अमेरिकेतील, विशेषतः ब्राझीलमधील मूळची मुक्तपणे पाण्यावर तरंगणारी जलवनस्पती आहे. तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक पद्धतीचा अवलंब केल्याने रासायनिक उपायांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते.
वडाळे तलावाच्या संवर्धनासाठी पनवेल महानगरपालिका आणि आयसीएआर-खरपतवार संशोधन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रम शास्त्रीय, पर्यावरणपूरक आणि जैवविविधतेच्या संरक्षणाला प्राधान्य देणारा प्रयोग ठरत आहे. तलाव जलपर्णीमुक्त करण्याबरोबरच त्याची जलपरिसंस्था आणि नैसर्गिक पर्यावरणीय संतुलन जपण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
जलपर्णी निर्मूलनाचे टप्पे
७ मे २०२६ सायटोब्यागस साल्विनी वडाळे तलावात सोडण्यात आले.
जलपर्णी पिवळसर व गर्द चाॅकलेटी होण्यास सुरुवात होते. (अपेक्षित कालावधी ०७ फेब्रुवारी २०२७)
जलपर्णी पुढील नऊ महिन्यात नष्ट होते.(अपेक्षित कालावधी०७ नोव्हेंबर २०२७)