

Polio Drops Without Prescription
पनवेल : लहान मुलांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तळोजा फेज-२ मध्ये उघडकीस आला आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाची परवानगी नाही, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नाही आणि लस साठविण्यासाठी आवश्यक शीतसाखळीची व्यवस्थाही नाही. तरीही तळोजा येथील ममता केमिस्ट या औषध दुकानातून लहान मुलांना पोलिओ लस दिली जात असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संयुक्त कारवाई केली असून, संबंधित दुकानातील औषधांची खरेदी-विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तळोजा फेज-२, सेक्टर २६ येथील ममता केमिस्टमधून लहान मुलांना अवघे २० रुपये घेऊन पल्स पोलिओ लस दिली जात असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात आली. यामध्ये संबंधित दुकानातून आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता लसीकरण केले जात असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, लसीची विक्री आणि वितरणासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनही नसल्याचे समोर आले.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती एफडीएला देत संबंधित दुकानावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २४ नोव्हेंबर रोजी ममता केमिस्टची तपासणी केली. तपासणीदरम्यान बायोपोलिओ (Biopolio) या लसीचा साठा दुकानात आढळला नाही. मात्र, या लसीची खरेदी कळंबोली येथील जानकी फार्मा या औषध दुकानातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे पोलिओ लस उणे २० अंश सेल्सिअस तापमानात साठविणे आवश्यक असताना संबंधित दुकानात त्यासाठी आवश्यक शीतसाखळी आणि योग्य साठवणूक व्यवस्था नसल्याचे आढळून आले. त्यामुळे लसीच्या सुरक्षित साठवणुकीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या अनियमिततेची दखल घेत एफडीएने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत संबंधित औषध दुकानाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच दुकानातील औषधांची खरेदी-विक्री थांबविण्याचे आदेश पारित केले आहेत.
बेकायदेशीररीत्या औषधे आणि लसींची विक्री अथवा वितरण करणारे वितरक आणि दवाखान्याची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिला आहे. महानगरपालिका आरोग्य विभाग आणि एफडीए यांच्याकडून यापुढेही अशा औषध विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.