Panvel Municipal Corporation : परवानगी नऊ मजल्यांची, उभारला दहावा मजला; पनवेल महापालिकेची 'North 26 वर' कारवाई!

एल.के. विवांता कन्स्ट्रक्शननंतर आता शिव डेव्हलपरच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
Panvel Municipal Corporation
Panvel Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 
विक्रम बाबर

पनवेल : बांधकामासाठी परवानगी नऊ मजल्यांची आणि प्रत्यक्षात उभारणी दहाव्या मजल्याची! अशा प्रकारे मंजूर बांधकाम आराखड्याला बगल देत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांविरोधात पनवेल महानगरपालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एल.के. विवांता कन्स्ट्रक्शननंतर आता खांदेश्वर येथील शिव डेव्हलपरच्या ‘North 26’ इमारतीतील अनधिकृत दहाव्या मजल्यावर महापालिकेने तोडक कारवाई केली. या कारवाईमुळे बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांचे धाबे दणाणले आहेत.

खांदेश्वर स्टेशन रोड, सेक्टर १७, खांदा कॉलनी येथील भूखंड क्रमांक २६ वर शिव डेव्हलपरकडून ‘North 26’ ही इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीला नऊ मजल्यांची बांधकाम परवानगी असताना विकासकाने दहाव्या मजल्याचे बांधकाम केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. याप्रकरणी प्रशासनाने संबंधित विकासकाला नोटीस बजावली होती. मात्र, नोटिशीनंतरही बांधकाम सुरूच ठेवल्याने महापालिकेने प्रत्यक्ष कारवाई केली. अनधिकृत मजल्यासाठी उभारलेल्या लोखंडी सळ्या गॅस कटरच्या साहाय्याने कापण्यात आल्या.

विशेष म्हणजे, कारवाईनंतर महापालिकेने इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ‘अनधिकृत बांधकाम’ असा फलक लावला आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार दहावा मजला अनधिकृत घोषित करण्यात आला असून, या मजल्यावर कोणतेही अतिरिक्त बांधकाम करू नये, तसेच या मजल्यावरील सदनिका अथवा व्यावसायिक गाळ्यांची खरेदी-विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे व उपायुक्त रविकिरण घोडके यांच्या सूचनेनुसार झालेल्या या कारवाईवेळी सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी बाळाराम रातांबे, प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, रायगड सुरक्षा रक्षक आणि एमएसएफचे जवान उपस्थित होते.

विकासकांच्या मनमानीला महापालिकेचा इशारा

मंजूर बांधकाम परवानगीपेक्षा अधिक मजले उभारून नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने नागरिकांनाही सावध केले आहे. सदनिका किंवा व्यावसायिक गाळा खरेदी करण्यापूर्वी मंजूर बांधकाम आराखडा, बांधकाम परवानगी आणि संबंधित मजल्याची अधिकृतता तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.