

पनवेल ः ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरल्याने आई रागावली असता 14 वर्षीय मुलगा रागाच्या भरात कुठेतरी निघून गेल्याने त्याचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार करण्यात आली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बी एन एस कलम 137 (दोन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
डेरवली येथील 14 वर्षीय मुलगा आई-वडिलांसह राहतो. तो आठवीत असून कोनगाव येथील शाळेत शिकतो. 29 जुलै रोजी सकाळी दहा वाजता त्याच्या आईच्या मोबाईलमध्ये पैसे नसल्याचा मेसेज दिसून आला. यावेळी बँकेत जाऊन अकाउंट मधील 30 ते 40 हजार रुपये कुठे गेले याची चौकशी केली असता सर्व पैसे गेम मध्ये खेळून वजा झाले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांचा मुलगा हा ऑनलाईन गेम खेळत असायचा. त्यात काही वेळेला पैसे जिंकायचा असे सांगत असे. ते बँकेतून घरी आले आणि मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याला ऑनलाइन गेम मध्ये पैसे घालवल्याबद्दल आई रागवली असता तो रागाच्या भरात शाळेची बॅग घेऊन कुठेतरी निघून गेला. मुलाचा त्यांनी शोध घेतला मात्र तो सापडून आला नाही. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुलांमध्ये वाढत्या मोबाईल गेमवरुन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातून सावरायचे कसे याची चिंता वाढली आहे.