.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
रायगड : 31 जुलैपर्यंतचा मच्छीमारी बंदीचा कालावधी संपल्याने खोलसमुद्रातील मच्छीमारी गुरुवारी (1 ऑगस्ट) सुरु होत आहे. रायगड जिल्हयात खोल समुद्रात मच्छीमारी करणार्या सुमारे 3 हजार 500 बोटी आहेत.
अनेक बोटी जाळी भरून मच्छीमारीसाठी सज्ज झाल्या आहेत. दोन महिन्याच्या बंदीमुळे बहुतांश परप्रांतिय कामगार गावाला गेले आहेत. जिलह्यातील मच्छीमारी बोटींवर सुमारे 40 हजार परप्रांतीय कामगार काम करतात. हंगामाच्या पहिल्या मच्छीमारीला बोटीवर काम करण्यासाठी सध्या कामगारच नसल्याने हजारो बोटींचा मच्छीमारीचा पहिलाच मुहूर्त हुकणार आहे.
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील सुमारे शंभर गावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चालतो. सुमारे 3 हजार 500 हजार नौकांच्या माध्यमातून खोल समुद्रातील मच्छीमारी चालते. 30 हजार कुटुंबे या मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. दरवर्षी सुमारे 40 हजार मेट्रिक टन एवढी मासळी रायगड जिल्ह्याच्या किनार्यावर पकडली जाते. जिल्हयातील मच्छी मोठ्या प्रमाणात निर्यातही होत असते.
अलिबाग, आक्षी, आग्राव, रेवस, बोडणी, उरण-करंजा, मुरुडमधील एकदरा, नांदगाव, मजगाव, बोर्ली, कोर्लई, श्रीवर्धन तालुका या किनारपट्टीच्या भागात मच्छीमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
रायगड जिलह्यात सुमारे 3 हजार 500 मच्छीमारी बोटी आहेत. त्यातील 2 हजार 500 बोटी प्रत्यक्ष मच्छीमारीसाठी सक्रीय असतात. मच्छीमारी बंदी काळातही येथे मत्स्य व्यवसायासंबंधी कामे सुरु असतात. मच्छीमार जाळ्यांची दुरुस्ती, होड्यांची डागडुजी, रंगरंगोटी होत असते.
गेल्या दोन महिन्यांची मासेमारी बंदीची मुदत 31 जुलै रोजी रात्री बारा वाजता समाप्त झाली आहे. नव्या मच्छीमारी हंगामाला जोमाने सुरुवात करण्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार सरसावले आहेत. सध्या बंदरात नौकांची डागडुजी, रसद जमा करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू आहे. रायगड जिल्ह्यात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी कामगार येतात. बंदी कालावधीत सुटीनिमित्त परप्रांतिय कामगार गावाकडे गेले आहेत. उरण तालुक्यातील मोरा, करंजा, अलिबाग तालुक्यातील वरसोली, नागाव, अलिबाग कोळीवाडा येथे या कामगारांनी वसाहती केल्या आहेत. सुटीनिमित्त गावाकडे गेलेले कामगार पुन्हा दाखल होऊ लागले आहेत. मत्स्य व्यवसाय विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात 40 हजारच्या आसपास परप्रांतीय कामगार असून दरवर्षी ही संख्या वाढते. गेली दोन महिने जिलह्यातील मच्छीमारी बंदरांवर शुकशुकाट होता. आता काही कामगार बंदरावर परतले आहेत. त्यामुळे बंदरांवर हळुहळू लगबग सुरु झाली आहे.
मच्छीमारीला उतरण्यापूर्वी सर्व कामगारांना आपल्या मूळ गावातील रेशनकार्ड, निवडणूक कार्ड, आधारकार्ड होडी मालकाला आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडे ओळख म्हणून द्यावे लागणार आहेत. 1 ऑगस्टपासून सुरु होणार्या नवीन हंगामाच्या मच्छीमारीसाठी नाखवा सरसावले आहेत. नौकांची दुरुस्ती, रंगकाम झाले आहे.
इंधन, मच्छीमारी जाळी तयार करून तरी बोटीवर चढविण्यात आली आहेत. सध्या पावसाचा जोर कमी आहे. वादळीवारे कमी झाले आहेत. गेली दोन महिने मच्छीमारी झालेली नसल्याने मोठया प्रमाणात मच्छी उपलब्ध होत असते. पहिल्याच हंगामात जास्तीत जास्त मच्छीमारी करून बंदी काळातील तोटा भरून काढण्याची तयारी मच्छीमारी नौकांच्या मालकांनी केली आहे. मात्र गावाकडे गेलेले परप्रांतीय कामगार अद्याप परतलेले नाहीत.
त्यामुळे मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी कामगार नसल्याने बोट मच्छीमारीसाठी काढता येणार नाही असे मच्छीमारांनी सांगितले. अद्याप दहा ते पंधरा दिवस कामगारांची वाट पहावी लागेल असे मालकांकडून सांगितले जाते.
मच्छीमारी बंदीचा कालावधी 31 जुलै रोजी रात्री 12 वाजता समाप्त होत आहे. 1 ऑगस्टपासून मच्छीमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या मच्छीमारांकडे मच्छीमारी नौका व्यवस्थित आहे, मासेमारी परवाना, विमा, खलाशांचे ओळखपत्र अशा आवश्यक गोष्टी पुर्तता केलेले मच्छीमार मच्छीमारीला जाऊ शकतात. तरीही मच्छीमारांनी हवामान अंदाज घेऊन मच्छीमारीला जावे.
- संजय पाटील, सहाय्यक उपायुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड