

Panvel Municipal Corporation Election
पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक विभागामार्फत तपास मोहिमांना वेग आला आहे. याच अनुषंगाने पनवेल मतदारसंघातील आचारसंहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ३ (एसएसटी) यांनी कामोठे चेकनाका येथे वाहन तपासणीदरम्यान १७ लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे.
सायन–पनवेल महामार्गावर नियमित वाहन तपासणी सुरू असताना पांढऱ्या रंगाच्या कारची तपासणी करण्यात आली. या तपासणीत कापडी पिशवीत १७ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. सदर रक्कम संशयास्पद वाटल्याने ती पथकाने जप्त केली.
ही कारवाई पनवेल महानगरपालिका निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभाग क्रमांक ११, १२ व १३ चे निवडणूक निर्णय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
या कारवाईदरम्यान आचारसंहिता पथक प्रमुख व अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, समन्वय अधिकारी तथा उपायुक्त रविकिरण घोडके, समन्वयक तथा अधीक्षक मनोज चव्हाण, स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ३ चे पथक प्रमुख ग्रामविकास अधिकारी सुदिन धनाजी पाटील, पथक सदस्य नरेंद्र गावंड, प्रशांत फडके तसेच कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जितेश नवघरे व श्रीवंता अक्षय सुर्यवंशी उपस्थित होते.
या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागास कळविण्यात आले असून त्यांच्यामार्फत आवश्यक तपास प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हिडिओ व्हिव्हींग पथक आदी सर्व पथकांना सतर्क राहून कडक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.