Panvel Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या टेंडरसाठी ‘फोन’चा अडथळा? इच्छुक ठेकेदारांची पालिकेत फरफट

गणेश घाट दुरुस्तीच्या निविदेची प्रत मिळविण्यासाठी नगरसेवक, सभापती, महापौरांना फोन करण्याची कथित सूचना; ठेकेदारांमध्ये नाराजी
panvel municipal corporation
panvel municipal corporationPudhari
Published on
Updated on

Panvel Municipal Corporation Ganesh Visarjan Ghats

पनवेल : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने गणेश घाटांची दुरुस्ती तसेच विसर्जनस्थळी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. साफसफाई, गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनुष्यबळ, मंडप, टेबल-खुर्च्या, तराफे आदी सुविधा पुरविण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या आहेत. मात्र, निविदेची प्रत मिळविण्यासाठी येणाऱ्या इच्छुक ठेकेदारांना बांधकाम विभागातच कथितपणे वेगळ्या अडथळ्याला सामोरे जावे लागत असल्याची चर्चा आहे.

काही इच्छुक ठेकेदारांच्या आरोपानुसार, निविदेची प्रत घेण्यासाठी बांधकाम विभागात गेल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्यांकडून स्थानिक नगरसेवक, सभापती तसेच महापौर यांना दूरध्वनी करण्यास सांगितले जात आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतरच निविदेची प्रत उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा काही ठेकेदारांनी केला आहे. या प्रकारामुळे निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

panvel municipal corporation
Panvel Doctor Harassment Case: द्विअर्थी मेसेज, इमोजी अन् हाताचे चुंबन घेत विनयभंग; महिला डॉक्टरच्या तक्रारीअंती पुरुष डॉक्टरवर गुन्हा

महापालिकेच्या निविदेत सहभागी होण्यासाठी इच्छुक ठेकेदाराला कागदपत्रे मिळविण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीची शिफारस किंवा दूरध्वनी करण्याची आवश्यकता का भासावी, असा सवाल ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे. ‘टेंडर कॉपी हवी असेल तर आधी फोन करा’, अशी कोणतीही अलिखित पद्धत अस्तित्वात असेल तर ती नेमकी कोणाच्या निर्देशानुसार सुरू आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.

गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असून, विसर्जनस्थळी नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होणार आहे. त्यामुळे संबंधित कामांची निविदा प्रक्रिया खुली, पारदर्शक आणि स्पर्धात्मक असणे अपेक्षित आहे. मात्र, इच्छुक ठेकेदारांना कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावणे आणि त्यानंतर लोकप्रतिनिधींना फोन करण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारींमुळे नाराजी व्यक्त होत आहे.

panvel municipal corporation
Panvel Water Shortage: भर पावसाळ्यात पोलीस ठाण्याला टँकरचा आधार; महापालिकेच्या जलवाहिनीतून अपुरा पाणीपुरवठा

काही इच्छुक ठेकेदारांना निविदेची प्रत न मिळाल्याने परतावे लागल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती ठेकेदार निविदा प्रक्रियेत सहभागी होणार आणि सर्व इच्छुकांना समान संधी मिळणार का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या कथित प्रकारामागे कोणाचा दबाव आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट करावे आणि नियमानुसार सर्व इच्छुकांना निविदेची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांच्या सुविधांसाठी काढलेल्या निविदेभोवतीच ‘फोन संस्कृती’ची चर्चा सुरू झाल्याने पनवेल महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news