

पनवेल: सहकारी महिला डॉक्टरला मोबाईलवरून द्विअर्थी संदेश आणि इमोजी पाठविणे, तसेच कर्तव्य बजावत असताना माहिती देण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचा आरोप एका पुरुष डॉक्टरवर करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील एका खासगी रुग्णालयात हा कथित प्रकार घडला. याप्रकरणी महिला डॉक्टरने थेट खांदेश्वर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर डॉ. तुकाराम शिंदे (४३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर आणि तक्रारदार महिला डॉक्टर एकाच रुग्णालयात कार्यरत आहेत. २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता रुग्णालयात कथित गैरवर्तन झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
डॉ. शिंदे याने महिला डॉक्टरच्या मोबाईलवर द्विअर्थी शब्दांचा वापर असलेले संदेश तसेच इमोजी पाठविल्याचा आरोप आहे. या संदेशांमुळे आपल्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याचे महिला डॉक्टरने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना माहिती देण्याच्या बहाण्याने आरोपीने गैरवर्तन केल्याचाही गंभीर आरोप महिला डॉक्टरने केला आहे. तक्रारीच्या आधारे खांदेश्वर पोलिसांनी डॉ. तुकाराम शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ मदने तपास करीत आहेत.