

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गणेशोत्सवाच्या काळात ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेली अर्हताकारी विभागीय परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ‘एसआयआर’च्या कामासाठी बहुतांश अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली असताना गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेण्याच्या नियोजनावर ‘दैनिक पुढारी’ने प्रश्न उपस्थित केला होता. ‘एसआयआरची धावपळ अन् गणपतीत विभागीय परीक्षा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेचे उपआयुक्त (मुख्यालय) कैलास गावडे यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात कार्यालयीन आदेश जारी केला. त्यानुसार ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणारी अर्हताकारी विभागीय परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम, २०२२ तसेच अर्हताकारी विभागीय परीक्षा नियम, २०२२नुसार ही परीक्षा घेण्यात येणार होती. मे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, नाशिक यांच्याकडून प्राप्त वेळापत्रकानुसार जुने पनवेल येथील विठोबा खंडप्पा हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये परीक्षेचे केंद्र निश्चित करण्यात आले होते.
दरम्यान, मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी (एसआयआर) महापालिकेतील मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित प्रशासकीय कामकाजासोबत एसआयआरची जबाबदारी सांभाळताना अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले होते.
याबाबत ‘दै. पुढारी’ने १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून गणेशोत्सव, एसआयआरचे काम आणि विभागीय परीक्षा या तिन्हींचा एकाचवेळी आलेला ताण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना या नियोजनामुळे होणाऱ्या अडचणींचाही मुद्दा मांडण्यात आला होता.
‘पुढारी’च्या वृत्तानंतर प्रशासनाने परीक्षेच्या नियोजनाचा फेरविचार करून ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक यथावकाश स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे कार्यालयीन आदेशात नमूद करण्यात आले आहे. आता संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.