

Panvel Municipal Corporation News
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून आज (दि.६) अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी नितीन जयराम पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी पनवेल महानगरपालिका कार्यालयात नगरसचिव नानासाहेब कामठे यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
नितीन पाटील यांच्या निवडीमुळे पनवेल महानगरपालिकेला आगरी समाजाचा पहिला महापौर लाभणार असून, ही बाब संपूर्ण आगरी समाजासह पनवेल शहरासाठी ऐतिहासिक ठरणारी आहे.
१० फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून, त्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रदेश पातळीवर नावांना मान्यता देण्यात आली असून महापौर व उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.
अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी नितीन पाटील व प्रमिला पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पनवेल तालुक्यातील कासारभाट हे नितीन पाटील यांचे मूळ गाव आहे. त्यांनी यापूर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून प्रभावीपणे काम केले असून सभागृहातील अनुभव, विषयांची सखोल मांडणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. व्यापक जनसंपर्क आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबतची तत्परता ही त्यांची ओळख आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कार्य केले आहे.
पनवेल विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून केलेले नियोजन व समन्वय पक्षाच्या यशात महत्त्वाचे ठरले. तसेच ‘अभिनव मित्र मंडळ’चे कार्याध्यक्ष आणि ‘जाणीव’ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन व सामाजिक उपक्रमांमध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महापौर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उपमहापौरपदासाठी निवड झालेल्या प्रमिला पाटील या भाजप कळंबोली मंडलच्या खजिनदार व सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. श्रेया महिला बचत गट व नंदिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कळंबोलीतील प्रभाग क्रमांक ०७, ०८ व ०९ मधून भाजप महायुतीचे सर्व १२ उमेदवार विजयी झाले असून हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. प्रभाग क्रमांक ०७ मधून प्रमिला पाटील यांनी विद्या गायकवाड यांचा दारुण पराभव केला. त्यांच्या सामाजिक कार्य, संघटन कौशल्य आणि नागरिकांशी असलेल्या जवळच्या संपर्कामुळे त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली आहे. त्यांचे माहेर आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यभूमी असलेल्या शिरढोण गावचे असल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
“नितीन पाटील आणि प्रमिला पाटील यांना समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा फायदा पनवेल महानगरपालिकेला निश्चितच होईल. जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबरच महापालिकेचा सर्वांगीण विकास ते साधतील. त्यांच्या निवडीचा निर्णय प्रदेश कार्यकारिणीने योग्य घेतला आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि सर्व नेत्यांचे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण असल्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय महायुतीत उत्तम समन्वय आहे.”
— परेश ठाकूर, माजी सभागृहनेते, पनवेल महानगरपालिका