

विक्रम बाबर
पनवेल : महानगरपालिकेच्या सत्ताकारणात आज मोठा टप्पा पार पडला असून महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पनवेल महानगरपालिकेत यंदा ओबीसी पुरुष प्रवर्गाचा महापौर बसणार हे निश्चित झाले असून, भाजप महायुतीकडे असलेल्या भक्कम संख्याबळामुळे महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होणार हे आता सांगण्याची गरज उरलेली नाही.
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीने तब्बल ५९ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या दमदार विजयाने विरोधकांना पूर्णपणे कोंडीत पकडले असून, आरक्षण सोडतीनंतर सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातीच राहणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पुरूषांमध्ये नगरसेवक नितीन पाटील तर महिलांमध्ये ममता प्रीतम म्हात्रे यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपकडून महापौरपदासाठी अनेक प्रभावी आणि अनुभवी नगरसेवकांची नावे चर्चेत असली तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. संघटनात्मक कामगिरी, जनाधार, सामाजिक समीकरणे आणि पक्षनिष्ठा या निकषांवर उमेदवाराची निवड केली जाणार असल्याचे संकेत आहेत. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देत भाजप शहराच्या कारभारावर आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीला संख्याबळाच्या बाबतीत मोठा धक्का बसला असून, सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचण्याची त्यांची स्वप्ने यावेळी अपूर्णच राहिली आहेत. महापौरपदासह उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरही भाजपचेच वर्चस्व राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरक्षण सोडतीनंतर सुरू झालेल्या या राजकीय हालचालींमुळे पनवेलच्या राजकारणात नव्या सत्ताकाळाची नांदी झाली आहे. आता प्रश्न एकच आहे,ओबीसी पुरुष प्रवर्गातून भाजपचा महापौर म्हणून अंतिमतः कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? याचे उत्तर लवकरच समोर येणार असून, पनवेलच्या राजकारणाला नवे वळण मिळणार आहे.