

पनवेल : विक्रम बाबर
पनवेल तालुक्यातील कसळखंड गावात कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत पात्रता नसताना दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा प्रकार आरोग्य विभाग आणि पनवेल तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला आहे. नुरूल हुडा इमामुल हक असे या कथित बोगस डॉक्टरचे नाव असून, त्याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, १९६१ मधील कलम ३३(१) व ३३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसळखंड गावात नुरूल हुडा इमामुल हक याने सुमारे दीड महिन्यापूर्वी दवाखाना सुरू केला होता. मात्र, त्याच्या नावापुढे डॉक्टर असा उल्लेख असला तरी त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैद्यकीय पदवी आहे का, याबाबत काही जागरूक ग्रामस्थांना संशय निर्माण झाला. ग्रामस्थांनी याबाबत आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.
त्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची माहिती पनवेल तालुका पोलिसांना दिली. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदा हारुगडे यांना चौकशीचे आदेश दिले.
सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाने कसळखंड येथील संबंधित दवाखान्यावर धाड टाकून तपासणी केली. यावेळी नुरूल याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा पात्रता नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. असे असतानाही तो रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत असल्याचे आढळून आले. दवाखान्यात औषधांचा साठाही आढळून आला.
प्राथमिक तपासात नुरूल हा रुग्णांनी घरी बोलावल्यास त्यांच्या घरी जाऊन उपचार करीत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे त्याने कसळखंड तसेच परिसरात यापूर्वी किती रुग्णांवर उपचार केले, कोणत्या आजारांवर उपचार केले आणि त्यातून कोणती औषधे दिली, याची माहिती पोलीस घेत आहेत.
तसेच त्याच्याकडे आढळून आलेला औषधसाठा त्याने नेमका कुठून मिळविला, त्यासाठी कोणाकडून औषधे खरेदी केली होती का, याचाही तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तीने वैद्यकीय पात्रता नसताना किती काळापासून अशा प्रकारे उपचार केले, याबाबतही पोलीस माहिती गोळा करीत आहेत.
नुरूल हुडा इमामुल हक हा सध्या कोन येथील इंडिया बुल्स सोसायटीतील म्हाडाच्या इमारतीत राहत असून, तो मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या व्यक्तीमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईची गरज
पनवेल तालुक्यात ग्रामीण भागात अशा प्रकारे वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून उपचार केले जात असल्यास त्याची माहिती नागरिकांनी आरोग्य विभाग किंवा पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कसळखंड येथील या प्रकरणाच्या पुढील तपासात नुरूल याने यापूर्वी किती रुग्णांवर उपचार केले आणि औषधांचा साठा कोठून आणला, याबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.