

उरण : राजकुमार भगत
अवजड कंटेनर वाहतुकीमुळे पूर्णपणे खिळखिळ्या झालेल्या आणि अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेल्या उरण येथील खोपटा जुन्या खाडीपुलाच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हाती घेतले आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात झाल्यानंतर पीडब्लूडीला उपरती झाली असून, या कामासाठी शासनाकडून 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
उरणच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या पुलाचे काम पूर्ण होण्यास किमान चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी दिली. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या संकल्पनेतून 1995 साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, जेएनपीए परिसरामुळे या पुलावरून क्षमतेपेक्षा अधिक (70 ते 80 टन वजनाच्या) कंटेनरची अवजड वाहतूक सुरू झाली.
या अतिभारामुळे पुलाच्या जोडण्या उखडल्या होत्या, लोखंडी गज बाहेर आले होते आणि रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. ऑगस्ट 2023 मध्ये पुलाला भगदाड पडल्याचे समोर आले, तर नोव्हेंबर 2024 मध्ये खड्ड्यांमुळे स्कूटी चालवणाऱ्या महिलांचे अपघात झाल्यावर पीडब्लूडीने तात्पुरती मलमपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर, उप अभियंता एन.डी. पवार यांनी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याचे सांगून हा पूल वापरण्यायोग्य असून, ऑडिटमधील सूचनांनुसार त्याचे मजबुतीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले होते.
जनतेच्या मागणीनंतर पीडब्लूडी ने पाच कोटी रुपयांच्या मूळ आराखड्याऐवजी 3.60 कोटी रुपये मंजूर करत दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू केले आहे. या कामात पुलाचे आयुष्यमान वाढवणारे आणि मजबूती देणारे तांत्रिक बदल केले जाणार आहेत. पाण्याखालील पुलाच्या पिल्लरची दुरुस्ती आणि बेअरिंग रिपेअरिंग. एक्सपॉन्शन जॉईंट आणि फिंगर जॉईंट दुरूस्ती. युएचपीसी (हाय अल्ट्रा परफॉर्मनंस काँक्रीट) काँक्रिटीकरण ट्रीटमेंट आणि डांबर लेअर टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
दुरुस्तीचे काम सुरू होताच, खोपटा पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गांचा वापर सुरू झाला आहे. तसेच, सध्या खोपटा-कोप्रोली मार्गाचेही काँक्रिटीकरण सुरू असल्याने, संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी सांगितले की, ‘वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमचे पोलीस कर्मचारी आणि मदतनीस यांची संख्या वाढवण्यात आली आहे.’ पुढील चार महिने उरणकरांना वाहतूक कोंडीचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.