

राजेश डांगळे
खांदा कॉलनी: पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्याकडे जात असल्याने पनवेलकरांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. पनवेल रेल्वे स्थानक परिसरात या मार्गासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना वेग आला असून, रेल्वे कर्मचारी आणि कामगारांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
पनवेल स्थानकात नव्या रेल्वे मार्गासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवरील विविध सुविधा, रेल्वे रुळांची कामे, सिग्नल यंत्रणा तसेच इतर तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल, नवीन पनवेल, नेरे, चिखली परिसरासह कर्जतच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने प्रवासाचा वेळ आणि वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
पनवेल हे नवी मुंबई आणि रायगड परिसरातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्यास या परिसरातील दळणवळणाला आणखी चालना मिळणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे पनवेल आणि कर्जत परिसरातील अनेक गावांना उपनगरीय रेल्वे सेवेचा थेट फायदा मिळणार आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
पनवेल रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामांकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. ‘पनवेल ते कर्जत रेल्वे प्रवास नेमका कधी सुरू होणार?’ हा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. या मार्गामुळे रायगड जिल्ह्यातील दळणवळण आणखी वाढणार आहे.
कामाचा वेग पाहता याच वर्षी या मार्गाचे लोकार्पण होऊन पनवेल-कर्जत रेल्वे सेवा सुरू होईल, अशी आशा पनवेलकर व्यक्त करीत आहेत. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. पनवेल-कर्जत रेल्वे सुरू झाल्यास पनवेलच्या वाहतूक व्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार असून, ‘पनवेल ते कर्जत रेल्वेचा प्रवास कधी सुरू होणार?’ याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.