Panvel Paddy Farming : पनवेल तालुक्यात शेतकऱ्यांची भातमळणीच्या कामांची लगबग

महिलांसह कुटुंब गुंतले शेतकामांमध्ये; शेतीचे अस्तित्व टिकविण्याची धडपड
Panvel Paddy Farming
Panvel Paddy Farmingpudhari photo
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी : राजेश डांगळे

यंदा पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने भातशेतीला चांगला आधार मिळाला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शेतीच्या कामांना सुरुवात करणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावर भातलावणीची कामे पूर्ण केली.

हिरव्यागार भातपिकांनी बहरलेली शेतशिवारं आता कापणी आणि झोडणीच्या हंगामामुळे पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. दिवाळीच्या सणापासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात झोडणीच्या कामांना सुरुवात झाली असून शेतकरी राजा सध्या शेतात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Panvel Paddy Farming
KDMC Encroachment Drive : फोफावणाऱ्या अतिक्रमणांमुळे २७ गावांचा श्वास कोंडला

ग्रामीण भागात भातशेती हा अनेक शेतकरी कुटुंबांचा प्रमुख व्यवसाय आहे. पावसाळ्यात नांगरणी, चिखलणी, भातलावणी आणि त्यानंतर पिकाची निगा राखण्याची कामे शेतकऱ्यांनी मेहनतीने पूर्ण केली. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या शेतीमध्ये यंदा पावसामुळे पिकांना पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे शेतात डोलणारी भाताची कणसे पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

मात्र भातपीक तयार झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा आधार घेत शेतकऱ्यांनी कापणीच्या कामांना सुरुवात केली. भाताची रोपे पिवळी पडून कणसे तयार झाल्यानंतर योग्य वेळ साधत कापणी करण्यात आली. त्यानंतर कापलेले भात वाळवून त्याची झोडणी करण्याची तयारी सुरू झाली. दिवाळीच्या सणादरम्यान अनेक गावांमध्ये झोडणीच्या कामांना वेग आला आहे.

Panvel Paddy Farming
Jalna News : १९ वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा

ग्रामीण भागात दिवाळीचा आनंद आणि शेतीच्या कामांची लगबग असे दुहेरी चित्र सध्या दिसत आहे. एका बाजूला घराघरांत दिवाळीचा फराळ, दिव्यांची रोषणाई आणि सणाचा उत्साह सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी कुटुंबातील सदस्य भात झोडणीच्या कामात गुंतले आहेत. महिला वर्गही भात गोळा करणे, वाळवणे आणि धान्य साठवण्याच्या कामात हातभार लावत आहे.

झोडणी पूर्ण झाल्यानंतर धान्य स्वच्छ करून ते वर्षभराच्या घरगुती वापरासाठी साठवले जाते. काही शेतकरी भाताची विक्रीही करतात. त्यामुळे वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ पदरात पाडून घेण्याचा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा काळ असतो.

ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण

शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे पनवेल तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतीक्षेत्र कमी होत असले, तरी आजही ग्रामीण भागात भातशेतीची परंपरा जपली जात आहे. बदलत्या परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. पावसाळ्यात चिखलात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात आता कापणी आणि झोडणीच्या माध्यमातून धान्य येऊ लागले आहे. दिवाळीच्या काळात शेतात सुरू असलेली भात झोडणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने कष्टाच्या फळाचा आनंद आहे. वर्षभराच्या मेहनतीनंतर घरात नवीन भाताचे धान्य दाखल होत असल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.