

Panvel Patalganga River Gas Cylinders Swept Away
पनवेल : मुसळधार पावसामुळे चावणे-जांभिवली परिसरात बुधवारी (दि.८) झालेल्या पूरस्थिती निर्माण झाली. पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे येथील एचपीसीएल (HPCL) प्रकल्पाची संरक्षण भिंत कोसळल्याने कंपनीच्या आवारातील मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर ओढ्याच्या प्रवाहातून वाहत जाऊन पाताळगंगा नदीत गेल्याची घटना घडली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पुराच्या पाण्यात वाहून जाणारे सिलेंडर पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही ग्रामस्थांनी पाण्यात वाहून आलेले सिलेंडर मिळविण्याचाही प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या घटनेत हजारो गॅस सिलेंडर प्रवाहात वाहून गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, नेमके किती सिलेंडर वाहून गेले याबाबत एचपीसीएल किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या गॅस सिलेंडरपासून सुरक्षित अंतर राखावे आणि कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नुकसानाचे पंचनामे आणि पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.