Thai Jasmine Rice: कोकणच्या मातीत आता थायलंडच्या जॅस्मिन राईसचा दरवळ

दुष्काळ सदृश्य परिस्थितीत सुखद कृषीवार्ता; नामशेष होणाऱ्या 'झीना कोलम'चेही पुनरुज्जीवन
Thai Jasmine Rice
Thai Jasmine RicePudhari
Published on: 
Updated on: 

जयंत धुळप

रायगड: पारंपरिक भातशेतीला फाटा देत सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील कृषीभूषण राज्य पुरस्कार प्राप्त प्रयोगशिल शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी पुन्हा एकदा शेतीत अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातील सर्वाधिक सुगंधी तांदूळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'थाई जॅस्मिन राईस'चे यशस्वी उत्पादन त्यांनी आपल्या शेतात घेतले असून, महाराष्ट्रात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच यशस्वी ठरला आहे.

गाडगीळ यांनी यंदा १३ गुंठे क्षेत्रात जॅस्मिन राईससह एकूण सहा प्रकारच्या देशी आणि विदेशी दुर्मीळ भात वाणांची केवळ बियाणे संवर्धनासाठी लागवड केली आहे. जॅस्मिन राईसव्यतिरिक्त गाडगीळ यांनी पिग्मेंटेड राईस प्रकारातील इंडोनेशियाचा ब्ल्यू राईस, लेबेनियाचा पर्पल राईस आणि व्हिएन्नाचा ग्रीन राईस ही विदेशी वाणेही बियाण्यासाठी उत्पादित केली आहेत.

यासोबतच महाराष्ट्राचा पारंपरिक इंद्रायणी आणि रायगड जिल्ह्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अस्सल गावरान 'झीना कोलम' (बथजिना) या वाणाचीही त्यांनी पुनर्लागवड केली आहे.

झीना कोलम या पारंपरिक भाताची उंची सुमारे पाच फुटांपर्यंत वाढत असल्याने मुसळधार पावसात ते लोळते आणि चिखलात पडते. याच भीतीपोटी शेतकऱ्यांनी त्याची लागवड बंद केली होती. मात्र, अतिशय बारीक दाणा आणि गुरांसाठी दर्जेदार पेंढा देणारे हे देशी वाण कायमचे नष्ट होऊ नये, यासाठी गाडगीळ यांनी त्याचेही पुनरुज्जीवन केले आहे.

Thai Jasmine Rice
Vikramgad liquor seizure: दिवाळीच्या तोंडावर अवैध मद्य वाहतुकीचा पर्दाफाश; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

थायलंडमधून मागवले जॅस्मिन राईस मूळ बियाणे

थायलंडमधून काही ग्रॅम स्वरूपात मागवलेले जॅस्मिन राईसचे मूळ बियाणे विविध प्रशासकीय आणि वाहतुकीच्या अडचणींवर मात करत तब्बल तीन महिन्यांनी गाडगीळ यांच्या हाती आले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या मेहनतीतून आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेत त्यांनी अखेर हे वाण कोकणातील मातीत यशस्वीरीत्या रुजवले.

थायलंडच्या स्थानिक भौगोलिक वातावरणात ९० दिवसांत तयार होणारे हे पीक महाराष्ट्रातील सूर्यप्रकाश आणि पर्जन्यमानामुळे परिपक्व होण्यास सुमारे १४० दिवसांचा कालावधी लागला. हे वाण 'फोटोसेन्सिटिव्ह' असल्याने सावलीच्या भागातील भाताचे चूड अधिक जोमदार वाढून त्याला जास्त फुटवे आल्याचे प्रयोगात दिसून आले. या वाणापासून एकरी सुमारे दोन हजार किलोपर्यंत (दोन टन) उत्पादन मिळणे शक्य असल्याचे गाडगीळ यांनी सांगीतले.

Thai Jasmine Rice
Vikramgad Planetarium Project: सुकसाळे येथे साकारतेय ६० आसनी भव्य तारांगण

आरोग्यवर्धक गुणधर्मांचा खजिना

थाई जॅस्मिन राईस हा संपूर्णतः ग्लुटेन फ्री असून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी गुणकारी मानला जातो. या तांदळात चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असून कर्बोदके, लोह, मॅंगनीज, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी-९, फॉलिक ॲसिड आणि मुबलक अँटिऑक्सिडंट्स असल्याने तो आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.