Vikramgad Planetarium Project: सुकसाळे येथे साकारतेय ६० आसनी भव्य तारांगण

चंद्रकांत घाटाळ यांचा लोकवर्गणीतून अवकाश विज्ञान प्रसाराचा अभिनव उपक्रम
Vikramgad Planetarium Project
Vikramgad Planetarium ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

सफाळे: ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची गोडी लागावी, त्यांना प्रत्यक्ष अवकाश निरीक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे (पाटीलपाडा) येथे ६० आसनी भव्य तारांगण उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राचे संस्थापक चंद्रकांत घाटाळ यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प लोकवर्गणीतून साकारला जात आहे.

भारतातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र स्थापन करणारे आदिवासी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या चंद्रकांत घाटाळ यांनी २०१५ मध्ये पालघर जिल्ह्यातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र कासा येथे सुरू केले.

या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मोठमोठ्या दुर्बिणींच्या साहाय्याने अवकाश निरीक्षणाची संधी दिली जाते.

Vikramgad Planetarium Project
Vikramgad liquor seizure: दिवाळीच्या तोंडावर अवैध मद्य वाहतुकीचा पर्दाफाश; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

तसेच विविध खगोलीय साधनांच्या माध्यमातून अवकाश विज्ञानाची माहिती विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्या या निस्वार्थी शैक्षणिक व वैज्ञानिक कार्याची दखल घेत त्यांना आजवर २५ हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

या कार्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने घाटाळ यांनी आता सुकसाळे (पाटीलपाडा) येथे ६० आसनी तारांगण उभारण्याचा संकल्प केला आहे.

Vikramgad Planetarium Project
Panvel Vasai suburban railway corridor: पनवेल ते वसई थेट लोकल; प्रवाशांना मिळणार लाभ

विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश तारवी व त्यांच्या कुटुंबीयांनी जमीन दानस्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची अनुभूती देणारे एक महत्त्वाचे केंद्र उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या उपक्रमासाठी अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र, कासा, सामाजिक कार्यकर्ते दिनेश तारवी, प्रकाश भोईर, डॉ. यशवंत गभाले (सायन रुग्णालय), धर्मा पाटील, प्रा. सुधीर भोईर, अभियंता जीत दुमाडा, प्रा. प्रद्युम्न पाटील, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट पदाधिकारी प्रमोद पाटील, SPAKT शैक्षणिक संस्थेचे सुकलाल पाटील, सबको शिक्षा फाउंडेशन, सुकसाळे ग्रामस्थ तसेच अनेक विज्ञानप्रेमी व्यक्ती व संस्था पुढाकार घेत आहेत.

विज्ञान शिक्षणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा

आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, नक्षत्रे, आकाशगंगा आणि विश्वाची रचना यांची माहिती दृकश्राव्य स्वरूपात अनुभवता येणार आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासोबतच विज्ञान शिक्षणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या तारांगण प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधी, कंत्राटदार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना आणि दानशूर नागरिकांनी आर्थिक तसेच वस्तुरूप मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन चंद्रकांत घाटाळ यांनी केले आहे. लोकसहभागातून उभे राहणारे हे तारांगण पालघर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.