

A man was seriously injured in Panvel after attempting to mediate a fight between two girls
पनवेल : कामोठे परिसरात दोन मुलींच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला झाल्याची गंभीर घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात १९ वर्षीय तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्ष शंकर भगत (वय १९, रा. उसरटी खुर्द, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, पनवेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हर्ष हा नोकरी निमित्त कामोठे येतील त्याचा मामा याच्या कडे राहत होता, त्याचे वडील याच कामोठे शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता १९ सप्टेंबर रोजी हर्ष कामावर गेला होता, त्याचा मित्र यांच्या सांगण्या नुसार हर्ष पुन्हा कामोठ्यातील त्याचा मित्र साहिल गजानन पाटील सोबत सेक्टर-३६, कामोठे येथील ज्यूडिओ शॉपजवळ गेला. साहिलला त्याचा परिचयातील मुलगी रुतुजा पानसकर (वय १७) व विशाखा विश्वकर्मा (वय १७) यांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी बोलावण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचल्यावर रुतुजा व विशाखा बोलत असताना त्यांच्या सोबत आलेल्या काही मुलांचा साहिलसोबत वाद सुरू झाला. तेव्हा हर्षने मध्यस्थी करत शांत राहण्यास सांगितले. मात्र त्याच्यावरच शिवीगाळ व हातघाईला सुरुवात झाली. त्यातून झटापट वाढली आणि त्यातील स्वराज नावाच्या मुलाने चाकू काढून हर्षच्या पाठीवर वार केला.
हल्ल्यानंतर विशाखा विश्वकर्मा ही आरोपींना घेऊन पसार झाली. जखमी अवस्थेत हर्षला त्याचा मित्र साहिलने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी हर्ष भगत याने दिलेल्या फिर्यादीवरून कामोठे पोलीस ठाण्यात स्वराज व त्याच्या साथिदारांविरोधात मारहाण व जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.