

शरद निकुंभ
पाली: पाली नगरपंचायतीच्या टेंबी येथील डम्पिंग ग्राऊंडवरील प्रदूषणाचा प्रश्न अद्यापही जैसे थे असून, कचरा व्यवस्थापनासाठी प्रस्तावित बेलिंग व श्रेडिंग प्रकल्प केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील धुसमसणारा कचरा, दुर्गंधी आणि विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रकल्पासाठी आवश्यक वीजभार उपलब्ध नसल्याने काम रखडल्याची माहिती समोर आली आहे.
टेंबी परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सर्व प्रकारचा कचरा टाकला जात आहे. ओला व सुका कचरा एकत्र साचत असल्याने मोठमोठे कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत.
त्यातून तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळे वारंवार आग लागून कचरा अनेक दिवस धुसमसत राहतो. परिणामी परिसरात धुराचे लोट पसरत असून शिक्षक वसाहत, टेंबी परिसर तसेच मढाळी व शिळोशीकडे जाणाऱ्या मार्गावरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काही महिन्यांपूर्वी नगरपंचायतीकडून डम्पिंग ग्राऊंडवरील समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून बेलिंग मशीन आणि श्रेडिंग मशीन बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. प्लास्टिक कचऱ्याचे गठ्ठे तयार करून त्याची विल्हेवाट लावणे तसेच ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे, असा या प्रकल्पाचा उद्देश होता.
त्यामुळे धूर, दुर्गंधी आणि कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बेलिंग व श्रेडिंग मशीन कार्यान्वित करण्यासाठी सुमारे 12 किलोवॅट वीजभाराची आवश्यकता आहे. डम्पिंग ग्राऊंड परिसरात सध्या तेवढी वीज क्षमता उपलब्ध नसल्याने महावितरणकडे स्वतंत्र डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महावितरणच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन डीपी उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अद्याप झालेली नाही. नगरपंचायतीने डीडीएफ (डिस्ट्रिब्युशन डेव्हलपमेंट फंड) अथवा अन्य उपलब्ध निधीतून खर्चाची पूर्तता केल्यास डीपी उभारणीचे काम तातडीने मार्गी लागू शकते. त्यामुळे आता प्रकल्प रखडण्यामागे तांत्रिक अडचणींपेक्षा निधीचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, डम्पिंग ग्राऊंडवरील परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कचऱ्याला लागणाऱ्या आगी, वाढती दुर्गंधी, माशा-डासांचा प्रादुर्भाव आणि परिसरात फिरणाऱ्या भटक्या जनावरांमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना सडलेल्या कचऱ्यातून निघणारे दूषित पाणी परिसरात पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
वारंवार आश्वासने
‘प्रकल्प लवकरच सुरू होणार’ अशी आश्वासने वारंवार दिली जात असली तरी प्रत्यक्षात कोणतीही प्रगती दिसत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डम्पिंग ग्राऊंडला संरक्षक भिंत उभारणे, कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण करणे, बेलिंग-श्रेडिंग प्रकल्प तातडीने सुरू करणे आणि वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन राबविणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
प्रश्न आणखी गंभीर बनण्याची भीती
पाली शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढणारे कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता आता केवळ आश्वासनांवर हा प्रश्न सुटणार नाही. नगरपंचायत आणि महावितरण यांनी समन्वय साधून आवश्यक निधीची तरतूद करीत प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे अन्यथा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न आणखी गंभीर बनण्याची भीती व्यक्त होत आहे.