Pali Ballaleshwar Temple
Pali Ballaleshwar TemplePudhari

Pali Ballaleshwar Temple: पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात अन्नछत्र सेवा ठप्प; गॅस टंचाईमुळे भाविकांची गैरसोय

इराण-इस्रायल युद्धाचे परिणाम; महाप्रसाद व लाडू निर्मितीही बंद, शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी
Published on

पाली : शरद निकुंभ

जागतिक स्तरावर इराण-इस्रायल युद्धाचे पडसाद आता थेट जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या अन्नछत्रांना बसत आहे. तीर्थक्षेत्राचा कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने प्रसिद्ध पालीतील अष्टविनायक गणपती मंदिर श्री बल्लाळेश्वर देवस्थान येथील अन्नछत्र सेवा बंद पडली आहे. परिणामी, दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, देवस्थानचा लोकप्रिय प्रसाद असलेला लाडूदेखील सध्या बंद झाला आहे.

Pali Ballaleshwar Temple
Mumbai Water Tax Hike: मुंबईत पाणीपट्टी वाढ अटळ? महापौरांच्या स्थगितीमुळे आर्थिक पेच

पालीतील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून शेकडो भाविक येतात. साधारणतः दिवसभरात 400 हून अधिक भाविक अन्नछत्रात केवळ 30 रुपयांत महाप्रसादाचा लाभ घेतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ही संख्या 800 च्या पुढे जाते. मात्र, गॅस टंचाईमुळे अन्नछत्र बंद झाल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

Pali Ballaleshwar Temple
Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिका सभागृहाचे कामकाज थेट प्रक्षेपणात? ठाकरे गटाची मोठी मागणी

कमर्शियल गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने मंदिर परिसरातील हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला असून, उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी भाविकांना अन्नासाठी अनेकपटीने जास्त खर्च करावा लागत आहे. अन्नछत्रातील सात्विक भोजनामुळे मिळणारे मानसिक व आध्यात्मिक समाधानही भाविकांना गमवावे लागत आहे. अन्नछत्रासोबतच देवस्थानचा अत्यंत लोकप्रिय प्रसाद लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. मात्र, पुरवठा बंद असल्याने लाडू निर्मितीही थांबली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता हा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. देवस्थान प्रशासनाने शासनाकडे विशेष बाब म्हणून कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत, भाविकांच्या सोयीसाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

Pali Ballaleshwar Temple
Mumbai Mayor Bungalow Renovation: डागडुजीनंतरच महापौरांचा बंगल्यात प्रवेश; 5 कोटींच्या नूतनीकरणावरून चर्चा

देवस्थानतर्फे अवघ्या 30 रुपयांत भाविकांना मुबलक भोजन दिले जाते. हा उपक्रम केवळ सेवाभावी वृत्तीने चालवला जातो. मात्र, सध्या कमर्शियल गॅस पुरवठा बंद असल्याने अन्नछत्र चालवणे अशक्य झाले आहे. लाकूड वापरून मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणे शक्य नाही, तसेच प्रदूषणही वाढते. शासनाने विशेष बाब म्हणून गॅस उपलब्ध करून दिल्यास आम्ही तात्काळ प्रसाद सेवा सुरू करू.

जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पाली

आम्ही दरवर्षी अष्टविनायक दर्शनासाठी येतो. बल्लाळेश्वराचा महाप्रसाद घेतल्याशिवाय आमची यात्रा पूर्ण होत नाही. केवळ 30 रुपयांत मिळणारे सात्विक जेवण हा आमच्यासाठी देवाचा आशीर्वाद असतो. मात्र, आता अन्नछत्र बंद असल्याने आम्हाला बाहेर महागड्या हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरू करावा.

विवेक भांगे, भाविक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news