

रेवदंडा: सहाण नागाव बायपास मार्गावरील पाले-नागाव येथील पुलाचा संरक्षक कठडा रविवारी पहाटेच्या सुमारास काेसळला असून हा पूला वाहतूकीकरिता अत्यंत धाेकादायक बनला असून परिसरातील वाहतुकीचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असल्याची माहिती नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी दिली आहे.
"किती वेळा हा धाेकादायक झालेला पूल तात्पूरता दुरुस्त करणार आणि किती वेळा लोकांच्या जीवाशी खेळणार? पूल कोसळल्यानंतर फक्त चौकशीची नाटकं होतात, पण गेलेले जीव परत येत नाहीत. आता केवळ आश्वासनं नकोत, तर थेट निर्णय हवा,अशा तीव्र शब्दांत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
दोन वर्षांपासून पत्रव्यवहार, तरीही प्रशासन ढिम्म
गेल्या दोन वर्षांपासून नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागासह, संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार पत्रव्यवहार करून पाले पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत सतत लक्ष वेधण्यात येत आहे.
मात्र, प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ कागदी आश्वासनं दिली गेली. प्रत्यक्षात मात्र कायमस्वरूपी कामाऐवजी फक्त थातूरमातूर डागडुजी करण्यातच वेळ घालवला गेला, असा थेट आरोप सरपंच मयेकर यांनी केला आहे.
सावित्री आणि तांदूळवाडी दुर्घटनांतून धडा कधी घेणार?
गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात अलिबाग-उसर मार्गावरील पूल काेसळला आणि वाहतूक सुमारे तीन महिने बंद राहीली हाेती. गॅस आॅथाेरिटी आॅफ इंडियाच्या उसर येथील नव्या प्रकल्पाची परदेशातून आलेली मशिनरी तीन ते चार महिने रस्तावरच अडकून पडल्याने काेट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यात बराेबर सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील भीषण दुर्घटना आणि महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत झालेल्या अतोनात जीवित व वित्तहानीच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.
दुर्दैवाने, त्याच प्रकारची अत्यंत धोकादायक आणि भीषण परिस्थिती आज पाले पुलावर निर्माण होताना दिसत आहे. असे असतानाही प्रशासन आणखी किती निष्पाप जीवांची बळी जाण्याची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
आज तातडीची बैठक
या गंभीर परिस्थितीची दखल घेत सोमवारी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनीक बांधकांम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवीन पाले पुलाच्या कामाबाबत स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ठोस मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने केली जाणार आहे. योग्य निर्णय न झाल्यास पुढील पाऊल उचलण्याचा इशाराही सरपंच मयेकर यांनी दिला आहे.
बेली पूल बंद असल्याने पाले पुलावर अतिरिक्त ताण
सध्या परिसरातील बेली पूल अत्यंत वाईट अवस्थेत असल्याने, सर्व प्रकारची जड वाहनांची वाहतूकही पाले पुलावरूनच वळवण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार आणि त्यातच पुलाचा मुख्य संरक्षण कठडा कोसळल्याने हा पूल कधीही मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.
कठडा कोसळल्याची घटना समजताच सरपंच हर्षदा मयेकर यांनी तत्काळ अलिबाग सार्वजनीक बांधकांम विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू केले असले, तरी अशा तात्पुरत्या उपायांनी नागरिकांचा जीव सुरक्षित राहू शकत नाही, असा सूर उमटत आहे