

रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: पेरणी होऊन महिना झाला असताना आता भात रोपांची वाढ बऱ्यापैकी झाली असून ज्या रोपांची उगवण चांगली होऊन रोपे लागवडीयोग्य झाली आहेत अशा रोपांची लागवड आता सुरू झाली आहे.
काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शेतामध्ये आलेल्या वाळू मिश्रित पुळणमुळे अजूनही ते रोपे लावणीयोग्य झालेले नाही. ट्रॅक्टरच्या सर्रास वापरामुळे आता लाकडी अवजारांना ब्रेक बसला असला तरी काही ठिकाणी आजही बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागात मजुरांची कमी जाणवू लागल्याने शेतकरी कुटुंबाला शेती कामात राबावे लागत आहे. सध्या पाऊस मुबलक प्रमाणात बरसत असल्याने अतिवृष्टीमध्ये झालेल्या पूर परिस्थितीमुळे काही शेतांमध्ये पुराच्या पाण्याबरोबर वाळू मिश्रित पुळण वाहून आल्यामुळे तेथील रोप लावणी योग्य वाढीस झालेले नाहीत.
तरी काही ठिकाणी उगवण चांगले झालेल्या रोपांची लावणीच्या कामांना खाडीपट्टा भागात गेल्या आठवड्यापासून वेग आला आहे. उशिरा का होईना बळीराजा शेतीच्या कामात मग्न असल्याचे चित्र सद्या खाडीपट्टयाच्या भागात आहे.
पारंपारिक भात लागवडीमुळे भाताचे उत्पादन मात्र कमी होत चालले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत नाही, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला चालना मिळावी यासाठी कृषी विभागाने आधुनिक भात लागवडीवर भर द्यावी असे मत येतील शेतीप्रेमी शेतकरी व्यक्त करीत आहेत.
बैलजोडीचा सांभाळ करणं अवघड होत असून बैलजोडीच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेती कामासाठी लागणाऱ्या लाकडी अवजारांच्या वाढत्या किमती, दुरुस्तीचा खर्च अवाक्य बाहेर जात आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टरच्या साह्याने मोठया प्रमाणात शेतीची कामे होत असून यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचत आहे. एक एकर शेतीच्या नांगरणीसाठी लागणारा सात ते आठ दिवसांचा कालावधी आज काही तासांवर आल्यामुळे कामे वेळेवर होत आहेत तसेच मजूर मिळत नसल्याने शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसंती दिली जात आहे.
तर आजही काही ठिकाणी बैलजोडीच्या सहाय्याने शेत नांगरणी सुरु आहे. महाडच्या खाडीपट्टयात आणखी पंधरा दिवस लावणीची लगबग राहणार असून पारंपरिक गाणी गात भात लावणीमध्ये शेतकरी मग्न झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
अतिवृष्टी होऊन सगळीकडे पूरमय परिस्थिती
लांबलेल्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे भात लावणीची कामे यंदा देखील उशिरा सुरू झाली आहेत, यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे पेरण्या केलेल्या वाया जातात की काय? दुबार पेरणीचे संकट उभे राहील की काय? असा प्रश्न भेडसावत असतानाच पावसाने जोरदार सुरुवात केली आणि पहिल्याच पावसाने अतिवृष्टी होऊन सगळीकडे पूरमय परिस्थिती केली होती.
तब्बल तीन दिवस पुराच्या पाण्याखाली रोपे गाडली होती त्यामुळे भात लावणी योग्य रोपे तयार होतील की नाही किंवा आलेली रोपे लावणीसाठी कशा पद्धतीने ताब्यात घेता येतील अशी चिंता शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र काही ठिकाणी गेल्या आठवड्यापासून भात लावणी ला सुरुवात झाली आहे.