Uran Muddy Water Supply: उरण पूर्व भागात दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दोन आठवड्यांपासून शुद्धीकरणाशिवाय पुरवठा
Contaminated Water Supply
Contaminated Water SupplyPudhari
Published on
Updated on

राजकुमार भगत

उरण: सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून उरण पूर्व भागात करण्यात येत असणारा पाणीपुरवठा गेल्या १५ दिवसांपासून अत्यंत गढूळ आणि दूषित येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

६ जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यापासून उरण पूर्व भागातील ग्रामस्थांना हेच गढूळ पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील जिते गावापासून ते उरणमधील गव्हाणफाटापर्यंतच्या सर्व गावांना हा दूषित पाणीपुरवठा होत आहे.

Contaminated Water Supply
Mumbai Water Stock: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! दोन दिवसांच्या पावसाने तलावसाठ्यात मोठी वाढ

हेटवणे धरणातील पाणी सिडको हद्दीत आणि उरण पूर्व भागातील गावांना पुरवले जाते. सिडकोचे गव्हाणफाटा येथे जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टरेशन प्लँट) असून तेथून पुढील गावांना आणि सिडकोच्या विकसित हद्दीला पाणी शुद्ध करून दिले जाते. मात्र, जिते ते गव्हाणफाटा दरम्यानच्या मध्यवर्ती गावांना जलशुद्धीकरण न करताच थेट अशुद्ध पाणी दिले जात असल्याचे समोर आले आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीपातळी खालावल्याने सिडकोने पाणीकपात केली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात ढवळून गढूळ झाले.

गव्हाणफाटा येथील फिल्टरेशन प्लँटमुळे त्यापुढील भागाला शुद्ध पाणी मिळत असले, तरी जिते ते गव्हाणफाटा दरम्यानच्या अनेक गावांना मात्र मागील दोन आठवड्यांपासून गढूळ पाणीच मिळत आहे. या परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी बाटलीबंद पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे, तर गरीब व आदिवासी बांधवांना नाईलाजाने हेच दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे.

Contaminated Water Supply
Andheri Manhole Death: साकीनाका मॅनहोल दुर्घटना चौकशी अहवाल गुलदस्त्यातच

सिडको प्रशासनाकडून या सर्व गावांकडून पाणीपट्टीची बिल वसुली नियमित केली जाते, मग नागरिकांना अशुद्ध आणि दूषित पाणी का दिले जाते, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. सिडकोने या संपूर्ण पट्ट्याला तात्काळ शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून हेटवणे धरणातील पाणी गढूळ झाल्यामुळे उरणच्या पूर्व भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. आणखी काही दिवस ही समस्या कायम राहण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी शुद्धीकरणासाठी 'सोडियम हायपोक्लोराईड'च्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे किंवा या औषधाचा वापर करूनच पाण्याचा वापर करावा.

- भास्कर मोकल, सरपंच, चिरनेर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news