फळबाग लागवडीसाठी शासनाचे दमदार पाऊल

फळबाग लागवडीसाठी शासनाचे दमदार पाऊल
Published on
Updated on

माणगाव; कमलाकर होवाळ :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वैयक्तिक लाभधारक शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी सलग बांधावर व पड जमिनीवर फळझाड, फुलझाडे, मसाला पिके यांच्या लागवडीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. ही योजना कृषी विभागामार्फत ०.०५ हेक्टरपासून २ हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीचा लाभ घेता येतो.

ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची असून ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कृषि विभागामार्फत देण्यात येऊन फळबाग, वृक्ष, फूलपिक लागवड सुरू केली जाऊ शकते. निवड झालेल्या लाभार्थी यांना कृषी विभागामार्फत शासकीय फळ रोपवाटिकामधून जातिवंत कलमे, रोपे अनुदानावर उपलब्ध करून तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

माणगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फळझाडे लागवडीसाठी वाव असून, हवामान आंबा, काजू, कोकम, बांबू, सोनचाफा इत्यादीसाठी पोषक असून पड जमीन फळबागेच्या लागवडीखाली आल्यामुळे पुढील तीन ते चार वर्षात शेतकऱ्याला शाश्वत उत्पादनाचे साधन तयार होऊ शकते तरी जास्तीत जास्त लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या कोणत्याही कार्यालयाशी संपर्क साधावा व आपली पड जमिनीवरती आपल्या आवडीनुसार फळबाग लागवड रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध आहे.

अर्ज कुठे करावा

ग्रामपंचायत कार्यालयात, तसेच प्रत्येक महसूली गावात २४ तास अर्ज टाकता येईल अशा सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी (उदा. अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत समाजमंदिर इ.) अर्ज पेटी ठेवण्यात येणार आहे. अर्ज करण्याचा कालावधी हा अर्ज वर्षभर करता येतो,
मात्र १५ जुलै ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आलेले अर्ज मंजूर करून त्या वर्षाच्या लेबर बजेटमध्ये समाविष्ट केले जातील.

योजनेत समाविष्ट पिके

आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिक्कू, जांभूळ, बांबू, साग, शेवगा इ., गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा, लवंग, मिरी, दालचीनी, जायफळ, बेहडा, हिरडा, रक्तचंदन, करज, शिवण, बेल, आईन, बिब्बा आदी.

आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा, ८अ उतारा, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, जॉब कार्ड, दारिद्र्य रेषेखाली असल्यास तो दाखला, जातीचा दाखला किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news