नववी पास तरुणाने यूट्यूबवर बघून छापल्या बनावट नोटा

नववी पास तरुणाने यूट्यूबवर बघून छापल्या बनावट नोटा

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : मौजमजेवर पैसे खर्च करण्यासाठी चक्क यूट्यूबवर बघून घरातच बनावट नोटांचा छापखाना चालवणार्‍या नववी पास तरुणाला पनवेल पोलिसांनी तळोजा येथे अटक केली. त्याच्याकडून दोन लाख तीन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, त्याने आतापर्यंत तब्बल 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात समोर आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव प्रफुल्ल गोविंद पाटील (वय 26) असून, त्याला तळोजा एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली. बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा रचून प्रफुल्लला अटक केली. त्याच्या खिशातही बनावट नोटा आढळल्या. नंतर त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आला. त्याने छापलेल्या 2 लाख रुपयांच्या 1 हजार 443 बनावट नोटा आढळल्या. त्यामध्ये पन्नासच्या 574, शंभरच्या 33 व दोनशेच्या 856 बनावट नोटांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news